# पवित्र रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज, तरावीह पठण करावे -गृहमंत्री अनिल देशमुख.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई: कोरोना विषाणूच्या विरुद्ध आपण सर्वजण लढा देत आहोत. या लढाईत विजयी होण्यासाठी लॉकडाऊन काळात नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यात मशिदीत आज़ान होईल. मात्र, मशिदीत अथवा रस्त्यावर एकत्र येऊन नमाज पठण न करता ते घरातच करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

आता रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे. त्यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देऊन गृहमंत्र्यांनी कोरोना पार्श्‍वभूमीवर अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले. नमाज, तरावीह पठण, इफ्तारसारखे धार्मिक कार्यक्रम घरातच करावेत. आपणा सर्वांना हे माहित आहे कि, कोरोनासारखा विषाणू हा जात, धर्म, पंथ, लिंग, गरिबी, श्रीमंती काहीही पहात नाही. कोरोनाबाधित एका व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कित्येक व्यक्ती बाधित होऊ शकतात. अनेक व्यक्ती एकत्र आल्यास कोरोना वाढण्याचा धोका होऊ शकतो. कृपया याची सर्व बांधवांनी खबरदारी घ्यावी, असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

कोणतेही धार्मिक सण, उत्सव, सार्वजनिक रितीने साजरे करण्यास या लाॅकडाऊनच्या काळात मनाई आहे . त्यामुळे रमजानच्या काळातही कोरोना प्रतिबंधक नियम, निर्देशांचे काटेकोर पालन करावे. ईफ्तार पार्टीचे सार्वजनिक आयोजन करू नये. आपणच आपली स्वतःची आपल्या कुटुंबाची व पर्यायाने समाजाची काळजी घ्यावी. ही कोरोनाविरुद्धची लढाई लढायची व जिंकायची आहे, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *