# काळाची पावले ओळखा…

 

प्रतिकात्मक छायाचित्र

सध्या जगभरात कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. एकट्या अमेरिकेत ५० हजारांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत, तर जगभरात सुमारे २ लाख लोक या महामारीत बळी पडले आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशात व मुंबई-पुणे यासारख्या शहरांमध्ये विशेषत: जिथे जास्त लोक दाटीवाटीने राहतात त्या शहरांमध्ये विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेसह सर्व चक्र थांबले आहे. देशाच्या विविध भागात लोक अडकले आहेत. मुंबई-पुण्यात काम-धंद्यासाठी देशाच्या विविध भागातून लोक आलेले आहेत. रेल्वे, बस बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या गावाकडे जात येत नाही. म्हणून अनेकांनी शेकडो किलोमीटर पायीच रस्ता धरला आहे. काहीजण सायकलवर जात आहेत.

मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे काम-धंदा नाही, जेवण वेळेवर मिळेलच याची शाश्वती नाही, यामुळे एकाच ठिकाणी राहून हे लोक त्रस्त झाले आहेत.  आता त्यांना त्यांची अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही. म्हणून त्यांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. मागील काही दिवसांपूर्वी तर अनेकांनी दुधाचे टँकर, कंटेनरसारख्या वाहनातून दाटीवाटीने व जीवघेणा प्रवास केला. एवढी ओढ यांना गावाकडची लागली आहे. त्यांना गावावकडे जाता यावे, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. अद्याप या मागणीला यश आलेले नाही.

नांदेड येथील हुजूर साहेब गुरूद्वाराला दर्शनासाठी पंजाब, हरयाणा, दिल्लीसह देशभरातून भाविक येतात. हे भाविकही मागील एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून अडकून पडले होते. दिल्लीहून आलेल्या एका दाम्पत्याची ८ वर्षाची मुलगी तर आई वडिलांच्या विरहाने आजारी पडली. तिला तेथे ऍडमीट करावे लागले होते. या भाविकांनाही त्यांच्या गाव शहराकडे जाता यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते, अखेर या प्रयत्नाला यश आले असून एका खासगी ट्रॅव्हल कंपनीने ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांची वाहने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नांदेड येथून सुमारे ५०० भाविक त्यांच्या गावाकडे रवाना झाली आहेत.

शिख भाविकांसाठी शासन प्रशासनाने दखल घेऊन जशी त्यांच्या गावाकडे जाण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणेच इतर राज्यांनाही त्यांच्या राज्यातून काम-धंद्यासाठी मुंबई-पुण्यात आलेल्या कामगारांना त्यांच्या गावाकडे जाता यावे, यासाठी प्रयत्न करावा. तसेच त्यांन  वाहने उपलब्ध  होतील, असे पहावे. कारण बस व रेल्वेगाड्या सुरू होतील, याच्या भरोशावर राहणे योग्य नाही. सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. हा ल़ॉकडाऊन त्यानंतरही वाढू शकतो. यासाठी या कामगारांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना वाहनाने त्यांच्या गावी पाठवण्यासाठी प्रयत्न करावा. या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांची वाहनेही एकाच ठिकाणी बसून आहेत. त्या वाहनांद्वारे या  कामगारांना उत्तर प्रदेश, बिहार व देशाच्या अन्य भागात ते  जेथून आले असतील त्यांना तेथे  पाठवावे. हे सर्व करताना सोशल डिस्टंन्सिंगही पाळ्णे आवश्यक आहे. तसेच ते ज्या जिल्ह्यातील आहेत, त्या जिल्ह्यात त्यांना पाठवताना त्यांची व्यवस्थित तपासणी होईल हेही पाहणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना १४ दिवस कॉरंटाईनमध्ये ठेवावे लागले तर तशी व्यवस्था करण्यास तेथील जिल्हा प्रशासनाला सूचित करावे. सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळून या कामगारांना जर अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या गावी पाठवता आले तर पुढील धोका नक्कीच टळणार आहेत. यासाठी शासन प्रशासनासह खासगी ट्रव्हल्सवाल्यांनीही यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.

येत्या काळात कोरोनाच्या महामारीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. कोरोनाच्या राक्षसाला थोपवायचे असेल तर त्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून व काळाची पावले ओळखून अशा उपाययोजना आखल्यास आपण कोरोनाच्या या गंभीर संकटावर मात करू. आपण या संकटावर मात केल्यास जगभरात आपण लॉकडाऊनसह राबलेल्या अन्य उपाययोजनांची चर्चा होणार आहे. तसेच देशभरासह जगातही आपला लौकिक वाढल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की…

संपादक: maharashtratoday.live
ईमेल:     vilas.single@gmail.com 
संपर्क:    9422210423

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *