भारताचा एकेकाळचा समाजिक-धार्मिक चेहरामोहरा बदलणारे आणि खऱ्या अर्थाने भारताला पुरोगामी राज्य बनविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव ११ एप्रिलपासून सुरु होत आहे. याच दिवशी महात्मा फुले यांची जयंती तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. आजघडीला भारतात जे काही सामाजिक समतेचे चित्र दिसत आहे. त्याची पायाभरणी करण्यात या दोन महापुरुषांनी केवळ सिंहाचाच वाटा उचलला नाही; तर त्यांचे काम जागतिक पातळीचा विचार केल्यास मानवी दास्य मुक्तीचा एक महायज्ञच होता. आज त्यांच्यामुळेच देशात सामाजिकतेच्या पुढे जाऊन राजकीय आणि आर्थिक समानता स्थापन होताना दिसत आहे. २५०० वर्षांपूर्वी महात्मा बुद्धांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ साठी सुरु केलेला लढा आजघडीला निर्णायक वळणार येऊन ठेपला आहे. या जयंती उत्सवानिमित्त पाहूया, आधुनिक भारतातील फुले यांनी कसा रचला सामाजिक समतेचा पाया आणि भीमराव आंबेडकर कसे झाले कळस!.
भाग एक – महात्मा फुले
माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याच्या पोटी ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झालेले महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीचे पितामह म्हटले आहे. आजच्या काळात फुले यांना अपेक्षित होत असलेले बदल पाहिल्यास, ते सामाजिक क्रांतीचे पितामह होते यात कोणीही शंका घेणार नाही. जगात कोणत्याची धर्माचा कोणताच ग्रंथ कोणत्याच देवाने किंवा दैवी शक्तीमुळे लिहिला गेला नाही, असा ठाम विश्वास महात्मा फुले यांचा होता. त्यातूनच त्यांनी हिंदू धर्मात सामाजिक, आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी मूलगामी बदल करण्याचा विचार मांडला. म्हणजेच त्यांनी धर्माची चिकित्सा करण्याचा आग्रह धरला होता. पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचिन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली. तर थॉमस पेन यांच्या १६ मार्च १७९१ रोजी प्रथम प्रकाशित झालेल्या ‘द राइट्स ऑफ मॅन’ या पुस्तकाचा त्यांच्या वैचारिक जडणघडणीत मूलगामी बदल झाला. थॉमस पेन यांनी या ग्रंथात असा विचार मांडला आहे, की राज्य जर आपल्या नागरिकांना नैसर्गिक हक्क, अधिकाराची सुरक्षितता देऊ शकत नसेल तर, राजकीय क्रांतीचे स्वागतच झाले पहिले (popular political revolution is permissible when a government does not safeguard the natural rights of its people). पेन यांचा हा ग्रंथ म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीवर टीका करणाऱ्या एडमंड बुर्क यांच्या ‘रिफ्लेक्शन ऑन दी रिव्होल्यूशन इन फ्रांस’ या ग्रंथाला दिलेले उत्तर होते. भारतात सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी असेच उत्तर फुले यांनी भारतातील कर्मठ समाजाला त्यांनी दिले आहे. ही क्रांती केवळ हिंदू धर्मापुरतीच मर्यादित नव्हे, तर तमाम भारतीय समाजासाठी होणे त्यांना अपेक्षित होते. फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या पायावरच २२ मार्च १९७० रोजी स्थापन झालेले मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई यांचे मुस्लिम सत्यशोक मंडळ हे होय. मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जीवन चरित्र, कुराण, हदीसवर खुल्या वातावरणात चर्चा करावी, धर्माची चिकित्सा करावी, धर्मातील वाईट गोष्टी कालपरत्वे काढून टाकाव्यात असा महात्मा फुले यांना अपेक्षित असलेला विचार दलवाई यांनी मांडला. आज जे काही मुस्लिम महिलांचा तीन तलाक प्रश्न निकाली निघाला हा महात्मा फुले यांच्याच विचाराचा परिपाक आहे. ब्राह्मणांचे कसब (१८६९), गुलामगिरी (१८७३) या (निबंध) पुस्तकांमधून महात्मांनी बहुजन समाजाची आर्थिक पिळवणूक कशी होत आहे हे दाखवून दिले. आजघडीला बहुजन समाज धार्मिक गुलामगिरी झुगारून ब्राह्मणी दास्यातून मुक्त होत आहे.
मागासवर्गीय उद्योजकांनीही Dalit Chamber of Commerce सारख्या उद्योजकांच्या संस्था स्थापन केल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रभावी मराठा समाज, १९९० मध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या समाज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मानसिक गुलामी झिडकारत आहे. यामागची प्रेरणा सुद्धा महात्मा फुले हेच आहेत. शेतकऱ्याचा आसूड (१८८३) मधून फुले यांनी एका अविद्येमुळे शेतकरी कसा नागवला जात आहे, शेतकऱ्यांची शोकांतिका अव्याहत कशी चालू आहे याची मीमांसा केली आहे. आजही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी लागत आहे, त्याचे कारणही महात्मा फुले यांनी सांगितलेली कारणमीमांसा हेच आहे. आणि आज राज्य सरकारला त्यांच्या नावानेच कर्जमुक्ती योजना सुरु करावी लागली हे त्या दृष्ट्या महापुरुषामुळेच. सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन क्षुद्र, महिलांना शिक्षण दिल्यामूळे तर आज बाबासाहेबांच्या रूपाने बाबासाहेबांसारखे राज्यघटनाकार मिळाले, सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात अनुसूचित जातीच्या मायावती मुख्यमंत्री झाल्या. मागास जातीतून आलेले के. आर. नारायण, रामनाथ कोविंद, महिला प्रतिभा पाटील हे राष्ट्रपती या सर्वोच पदावर गेले. १९३ वर्षांपूर्वी जन्मलेल्या या महापुरुषाचे उपकार फेडणे म्हणजेच त्यांना अपेक्षित सर्वच प्रकारच्या महिला, बाल, मागास, कष्टकरी अशा सर्वच समाजाला न्याय मिळवून देणारा सामाजिक समतेचा रथ आणखी पुढेच पुढे नेने ही आपली जबाबदारी आहे.
– ॲड. रावण धाबे, हिंगोली
मोबाईल- 6003000038
ईमेल- rdhabe@gmail.com
लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.
Thanks