मुंबईः राज्य सरकारने १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी जारी केले. नवी नेमणूक मिळालेल्या अधिकाऱ्यांपैकी अनेक जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आज जारी झालेल्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी अभिमन्यू काळे यांची तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागाचे उपायुक्त आर.बी. भोसले यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
चंद्रकांत डांगे यांची महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या संचालकपदी, डॉ. एम.एस. कलशेट्टी यांची पुण्यातील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदी, तर डॉ.अश्विनी जोशी यांची महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर बदली करण्यात आली आहे. प्रवीण दराडे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर तर पल्लवी दराडे यांची नियुक्ती मंत्रालयातील गृह विभागाच्या अपिल आणि सुरक्षा विभागाच्या सहसचिवपदावर, जयश्री भोज यांची नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळांच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर करण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी बदली झाली आहे. कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर.एस. क्षीरसागर यांची अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर नाशिक विभागाचे उपायुक्त आर.के. गावडे यांची नंदूरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. रायगड जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष बी.बी. दांडगे यांची शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
दुग्धविकास आयुक्त या रिक्त पदावर एच.पी. तुम्मोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त आर.बी. भोसले यांची तर डॉ. के.एच. कुलकर्णी यांची संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर नेमणूक झाली आहे.