मुंबई: मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली.
याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्डचा दुसरा संच आहे, याआधीसुद्धा एक संच राष्ट्रपती यांना पाठविण्यात आला आहे.
सुभाष देसाई यांनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट:
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची दिल्लीतील परिवहन भवन येथे आज भेट घेतली. बैठकी दरम्यान याविषयासंदर्भात उभय मंत्रीमहोदयांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.