मागील सुमारे सहा महिन्यांपाससून राज्य, देशासह जगभरात एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे कोरोना किंवा कोविड 19 या विषाणूची. कोरोनामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. कोरोनामुळे जनजीवन ठप्प झालेलं आहे. कधी या विषाणूची बाधा होईल ते सांगता येत नाही. झाली तरी यातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घाबरून जाणाऱ्यांची संख्याच जास्त आहे. काल कोरोनाची बाधा झालेल्या एक घटना चर्चेत आली. धुळे जिल्ह्यातील एका कुटंबाला कोरोनाची बाधा झाली. कुटुंबातील सर्व सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यातील पॉझिटिव्ह असलेल्या तरूण मुलीला धुळ्यातील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील सुनील धुमाळ या आरोग्य कर्मचाऱ्याने त्या मुलीची पोटच्या मुलीसारखी काळजी घेतली. मुलगी कुटुंबापासून दूर असल्यामुळे तिच्या मनाची घालमेल वाढली होती. ही घालमेल बघून धुमाळ यांनी त्या मुलीला घरचे जेवण देऊन तिची पित्याप्रमाणेच काळजी घेतलली. कोरोनातून बरे झालेल्या त्या मुलीला घ्यायला तिचे वडील आले. त्यांनी सुनील धुमाळ यांना मुलीची काळजी घेतल्यामुळे दहा लाख रूपये देऊ केले. मात्र, धुमाळ यांनी पैसे न घेता ते माझे कर्तव्य होते, असे सांगून पैसे घेतले नाहीत. माणुसकीचा ओलावा जीवंत असलेल्या या घटनेमुळे कोरोनाच्या या महामारीतही सुखद दिलासा मिळाला आहे.
दुसरी घटना पुण्यातील. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहरात सुमारे दोन वर्षापूर्वी महापालिकेने सुमारे दोन कोटी रूपये खर्चून शहराच्या काही भागात ई टॉयलेट उभारले. या टॉयलेटच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेने संबंधित कंपनीकडेच सोपवली होती. वर्षभरानंतर देखभालीसाठी महापालिकेने कंत्राटदार नेमला त्याचीही मुदत संपल्याने हे ई टॉयलेट सध्या धूळ खात पडून आहेत. या टॉयलेटच्या परिसरात धूळ, घाण व दुर्गंधी असल्याने त्याचा वापर करण्यापेक्षा त्याचा त्रासच अधिक जाणवत होता. या धूळ खात पडलेल्या या ई टॉयलेटमध्ये बेघर असलेल्या एका कुटुंबाने चक्क संसारच थाटला आहे. रस्त्याच्या कडेला, रेल्वे स्टेशन परिसरात अनेक बेघर राहतात, हे आपण पाहिले आहे. मात्र, चक्क टॉयलेटमध्ये घर म्हणजे, ऐकून आश्चर्य वाटले असेल. मात्र, पुण्यात तेही शक्य करून दाखवले आहे.
विशेष म्हणजे या एका ई टॉयलेटसाठी महापालिकेने सुमारे 12 ते 15 लाख रूपये खर्च केले. यासाठी दोन कोटी रूपये लावले. दोन वर्षात या ई टॉयलेट योजनेची वाट लागली. शहरात सर्वसामान्यांच्या सोयीसाठी व विशेषत: महिलांसाठी टॉयलेट असणे गरजेचे आहे. मात्र, एखाद्या योजनेकडे दुर्लक्ष झाले की, त्याची अशी वाट लागते, हे यावरून लक्षात येते.
-विलास इंगळे, संपादक
maharashtratoday.live
ईमेल: vilas.single@gmail.com
संपर्क: 9422210423