पुणे: राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलेल्या शब्दाचा दुसरा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवार, ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे महामंडळ कार्यान्वित करून याच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुणे येथील येरवडा परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय साकारले आहे.
रविवारी सायंकाळी ६ वाजता आयोजित या सोहळ्यास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेल्या कामगारांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र दिले जाणार आहेत.
हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक -धनंजय मुंडे: आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत. समाज कारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचे प्रयत्न आहेत. यादृष्टीने शासन स्तरावरदेखील सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.