२२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात सूत्रधारास अटक

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.

मे. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या सर्व बोगस कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले. सदर व्यक्तीच्या अधिक चौकशीमध्ये आढळून आले की, नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या २६ बोगस कंपन्या चालवत असून, या कंपन्यांमार्फत आतापर्यंत २२१५ कोटी रुपयांची बोगस बिले बनविण्यात आलेली आहेत. या बोगस बिलांमध्ये डायमंड, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला १२६ कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे. ह्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर धागेदोरे आहेत का? याबाबतचा तपास सुरु आहे.

महानगर दंडाधिका-यांनी या व्यक्तीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई सहायक राज्यकर आयुक्त गणेश विलास रासकर, अविनाश ब. चव्हाण, संजय मो. शेटे व इतर सहायक राज्यकर आयुक्त यांनी संयुक्तपणे राबविली तसेच, या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले. ही संपूर्ण कारवाई संजय विष्णू सावंत, राज्यकर उपआयुक्त व राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण- अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. राहुल व्दिवेदी यांनी नुकताच राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-अ, मुंबई या पदाचा कार्यभार स्वीकारला असून, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत बोगस बिलांसंदर्भात एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *