आता ब्लॉकचेन प्रणालीद्वारे जारी होणार जात प्रमाणपत्रे

क्यूआर कोडद्वारे प्रमाणपत्राची सत्यता तपासणी करणे होणार शक्य

मुंबई: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यात जात प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जात प्रमाणपत्रांची नक्कल, खोटी प्रकरणे रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक विजेत्या लेजीटडॉक या स्टार्टअपची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या डिजिटल स्वाक्षरी केलेली जात प्रमाणपत्रे नागरिकांना महाऑनलाइन पोर्टलद्वारे जारी केली जातात. तथापि, बहुसंख्य लोक सोयीच्या दृष्टीने जात प्रमाणपत्रे कागदी प्रिंटच्या स्वरूपात बाळगतात आणि यामुळे छापील कागदांवरील डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करणे शक्य होत नाही. डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे जारी करूनही आज जात प्रमाणपत्रांची नक्कल आणि खोटी प्रकरणे निदर्शनास येतात. हे टाळण्यासाठी आता ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत पॉलीगॉन पीओएस तंत्रज्ञानाचा वापर करून जात प्रमाणपत्रे ब्लॉकचेन प्रणालीद्वारे प्रमाणित करता येणार आहेत. प्रत्येक जात प्रमाणपत्रावरील महत्त्वाचे तपशील पॉलीगॉन पीओएस ब्लॉकचेन सिस्टीमद्वारे  क्रिप्टोग्राफिक क्यूआर कोड स्वरुपात दर्शविले जातील. या क्यूआर कोडद्वारे शासकीय विभाग अथवा इतर कोणत्याही कार्यालयांना या प्रमाणपत्राची पडताळणी व सत्यता सत्यापित करणे शक्य होणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागात राबविला जात असून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या एटापल्ली आणि भामरागडमधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली उपविभाग कार्यालयाच्या अधिपत्याखालील सुमारे ६५ हजार जात प्रमाणपत्रांची माहिती पडताळणीचे काम सुरू आहे. पुढील एका महिन्यात जात प्रमाणपत्रांचा सर्व डेटा ब्लॉकचेन प्रणालीमध्ये भरला जाणार आहे. क्यूआर कोड असलेली ब्लॉकचेन-सक्षम जात प्रमाणपत्रे जिल्ह्यातील सामायिक सेवा केंद्रांद्वारे (सीएससी) नागरिकांना प्राप्त करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *