स्मरणिका समितीची बैठक उत्साहात
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या वतीने 12 व 13 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे 12 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंदुमती जोंधळे व स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे या आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनात परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन, खुले कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथास्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे अनोखे प्रदर्शन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या निमिताने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान,अंबाजोगाईच्या आठवणींची स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यासंदर्भात स्मरणिका उपक्रम समितीची बैठक दिनांक ४ ऑक्टोबर २०२६, रविवार रोजी स्वागताध्यक्ष शंकुतलाताई लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली एम.आय.टी. संकुल, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे झाली. प्रारंभी अंबाजोगाईच्या आठवणी असणारे लेख असणारी स्मरणिका उपक्रमाचे प्रमुख विलास इंगळे यांनी सभाध्यक्षांच्या परवानगीने उपस्थित सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करून बैठकीला सुरुवात केली.
दरम्यान, विलास इंगळे यांनी स्मरणिका उपक्रमास प्रतिसाद चांगला असून आतापर्यंत 30 लेख आले असल्याचे सांगून मुखपृष्ठ डिझाईन, वापरावयाचा कागद याबाबत काही मुद्रक, संपादक यांच्याशी चर्चा करणे चालू असल्याचे सांगीतले. तसेच अंबाजोगाईतील विविध चळवळी व दिवंगत मान्यवरांच्या आठवणी एकत्र करण्याचे नियोजन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे यावेळी म्हणाल्या की,
कसल्याच प्रकारची वादावादी न होता खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक बैठक होत असल्यामुळे संमेलन छानच होईल, याची खात्री आहे. बैठकीस स्वागताध्यक्ष शंकुतला लोमटे यांच्यासह मार्गदर्शक अमर हबीब, स्वागत समितीचे सचिव गोरख शेंद्रे, उपक्रम प्रमुख विलास इंगळे, डॉ. शिरीष खेडगीकर, अॅड. सुनील काळदाते, प्रभाकर आगळे, महावीर भगरे व अरुण थोरात उपस्थित होते. सचिव गोरख शेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.