पुणे: राज्यात गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस 18 मे पर्यंत कायम राहणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पुणे शहरातही दिवसाआड पाऊस हजेरी लावत आहे. पुणे शहर व परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. आज शनिवारी पुन्हा शहराच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
राज्यातील उत्तर कोकणमधील ठाणे, रायगड, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिधुंदुर्ग, उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, अहमदनगर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा भागातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या भागाबरोबरच विदर्भात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटात पाऊस बरसणार आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला.