# मराठवाड्यासह विदर्भात उष्णतेची लाट; नागपूर ४६.७ तर परभणी, नांदेडचा पारा ४५ अंशावर.

 

पुणे: कोरड्या हवामानाची स्थिती आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानवाढ होऊन राज्यात सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. परभणी, नांदेडचा पारा ४५ अंशावर गेला आहे.

नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेची ही लाट पुढील दोन दिवस अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  ढगाळ वातावरणाची स्थिती दूर होऊन गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागांमध्ये कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यातच राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट निर्माण झाली. गेल्या तीन दिवसांपासून या भागातून कमी उंचीवरून उष्ण वारे राज्याकडे येत आहेत. परिणामी राज्याच्या दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. सध्या विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्र लाट आल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. या भागातील तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात अंगाची लाहीलाही करणारे ऊन जाणवत आहे.

मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. परभणी, नांदेड येथे सर्वाधिक चटका जाणवत आहे. औरंगाबाद येथे रात्रीच्या तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४.८ अंशांनी वाढल्याने तेथे रात्री कमालीचा उकाडा आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव येथील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, पुणे, सांगली, सातारा या भागातील उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण विभागातील मुंबईसह सर्वच ठिकाणचा तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. कोकण विभागात काही ठिकाणी २८ मे रोजी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *