# महावितरणमध्ये सेवानिवृत्तांच्या पुनर्नियुक्त्यांवर येणार गंडांतर; रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याचे उर्जामंत्र्यांचे संकेत.

 

मुंबई: महावितरण कंपनीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याबाबत डॉ.नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बुधवार, 10 जून रोजी झालेल्या बैठकीत आढावा घेतला.  दरम्यान, रिक्त जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दाराने नियुक्त्या देणे गैर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने सेवानिवृत्तांच्या पुनर्नियुक्त्यांवर गंडांतर येणार आहे. तसेच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

सदर कंपनीमध्ये आकृतीबंधानुसार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे पुनर्मूल्यांकन करुन ही पदे खरोखरच आवश्यक आहेत काय ? याबाबत आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

ऊर्जा विभागामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात असून कंपनी नियमानुसार महावितरणची क्षमतावृध्दी अपेक्षित आहे. तथापि, या विभागाशी संबंधित उद्भवणाऱ्या उणीवांबाबत असंख्य तक्रारी येत असतात याचाच अर्थ महावितरणच्या प्रणालीमध्ये दरी असल्याचे आढळून येते. तसेच रिक्त जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दाराने नियुक्त्या देणे गैर आहे, त्यामुळे तरुणांच्या रोजगाराची संधी हिरावली जाते.

महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान शाखेत सुमारे 550 पदे असतांना सुध्दा या क्षेत्रात हवी ती उंची गाठता आलेली नाही. राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहक आणि महावितरण कंपनी यामध्ये सुसूत्रता निर्माण होऊ शकली नाही त्यामुळे या शाखेला सुधारणे, अद्ययावत करणे महत्वाचे आहे.

महावितरणच्या वित्त विभागात देखील मोठ्या प्रमाणात पदे अस्तित्वात असून या क्षेत्रातही महावितरणचे काम समाधानकारक नाही. या व्यतिरिक्त महावितरणच्या जनसंपर्क विभागाने माहिती बरोबरच तक्रार निवारणाच्या कामात सहाय्य करणे आवश्यक आहे, या दृष्टीने सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कामांचे, त्यांच्या कर्तव्यआणि जबाबदाऱ्यांचे पुनर्मूल्यांकन करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संचालक (मानव संसाधन) महावितरण यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *