# पिंपरी चिंचवड आरटीओ ऑफिसचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार; ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक.

 

पुणे: लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज सोमवार, 22 जूनपासून सुरु होत आहे. मात्र, पक्का व शिकाऊ परवान्याप्रमाणे आता कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी आगाऊ वेळ (अपॉइंटमेंट) घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.

परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र, हस्तांतरण यांसह विविध नियमित कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड कार्यालयाने सर्वच कामांसाठी आगाऊ वेळ घेणे बंधनकारक केले आहे. पूर्वनियोजित वेळ घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. त्यानुसार या कार्यालयासाठी प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे. तसेच सहा.मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. शिबीर कार्यालयाचे कामकाज मात्र बंद राहणार आहे. पूर्वी केवळ अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण या सेवासाठीच ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. परंतु आता सर्वच कामकाजासाठी पूर्व नियोजित वेळ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या कार्यालयाकडून घेण्यात येणा-या दक्षता व नागरिकांकरीता सूचना केल्याप्रमाणे दोन अर्जदारामध्ये किमान 6 फुटांचे अंतर असावे, एक अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनिटायझ करणार असून अर्जदारास मास्क व हँडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश दिला जाईल. कार्यालयामध्ये सॅनिटायजरचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवण्यात आलेला आहे.

वाहनविषयक कामासाठी सर्व वाहनांकरीता वाहनावरील कर्ज बोजानोंद कमी करणे -10, डुप्लिकेट आरसी देणे-05, नाहरकत प्रमाणपत्र देणे-15, वाहन नावापर सूचना देणे-02, नावापर प्रमाणिक करणे/कमी करणे-02, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे/ निलंबन करणे-01, बाहेरील राज्यातील वाहनांना नंबर देणे (RMA)-02, आरसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे-02, मोटार वाहनात बदल करणे-05, नाहरकत प्रमाणपत्र रद्द करणे ( NOC)-01, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल करणे-02, परिवहन संवर्गातून खाजगी संवर्गात वाहनांची नोंदणी करणे (conversion vehicle)-02, वाहनावर कर्ज बोजा नोंद करणे-10, वाहनावर कर्ज बोजा नोंद कायम ठेवणे-02, वाहन हस्तांतरण करणे-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे – टॅक्सी-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे- बसेस-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे- ऑटो रिक्षा-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे- मालवाहतूक वाहने-10, कच्ची अनुज्ञप्ती (LLR) सर्व वाहने- 21, पक्की अनुज्ञप्ती- सर्व वाहने-49 अशा प्रकारे दैनंदिन अपॉइंटमेंट कोटा ठरवून देण्यात आला आहे.

या कामकाजाच्या ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर आगाऊ वेळ घेणे आवश्यक असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड विनोद सगरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *