# राजू शेट्टी यांनी विधान परिषदेची आमदारकी नाकारू नये; अन्यथा औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा.

औरंगाबाद:  महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यावरून संघटनेतील काही नेते विरोध करीत आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही कोणत्याही पक्षाकडून दिलेली उमेदवारी नाही तर महाआघाडीतील घटक पक्ष म्हणून ‘स्वाभिमानी’ ला एक विधान परिषदेची जागा देण्याचे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ठरले होते. त्यानुसार राज्यपाल नियुक्त जागेसाठी राजू शेट्टी यांचे राजकीय, सामाजिक कार्य लक्षात घेऊन तसेच सभागृहात त्यांच्यासारख्या अनुभवी, नेत्याची शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे अशा काळात मतभेद निर्माण करून संघटनेवर दबाव निर्माण करणे हिताचे नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारावी, अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

या संदर्भात अनेक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी राजू शेट्टी यांच्या नावाला समर्थन दिले आहे. आम्ही आपल्यासोबत आहोत. राजू शेट्टी यांनी उमेदवारी मागे घेऊन आमदारकी नाकारल्यास औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील संघटनेचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, अशी माहिती संघटनेचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवाजी हुसे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य बिभीषण बहिरट, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण खेडकर, उपाध्यक्ष ज्योती सोनवणे, स्वाभिमानीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, चंद्रशेखर साळुंके, कृष्णा साबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *