आंबडवे (जि. रत्नागिरी): निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांपैकी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेले आंबडवे (ता.मंडणगड, जि.रत्नागिरी) हे आहे. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आंबडवे गाव दत्तक घेत असल्याचे येथे आज जाहीर केले. डिक्की संस्थेबरोबरच खादी ग्रामोद्योग विकास मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटु) या प्रकल्पाबरोबर सहयोगी संस्था म्हणून कार्यरत राहणार असल्याचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी यावेळी सांगितले.
या संकल्पनेत संपूर्ण गाव आत्मनिर्भर होणार असून या गावातील प्रत्येक घरात लघुउद्योग राबवून स्वयंरोजगाराची यामुळे संधी निर्माण होणार आहे. या योजनेत अगरबत्ती तयार करणे, सोलर हातमाग, रुमाल तयार करणे अशा पद्धतीने प्रत्येक घराला एक प्रकल्प व यंत्र देण्यात येणार आहे. यासाठीचा कच्चा माल खादी ग्रामोद्योग मंडळ पुरवणार आहे. तसेच यासाठीचे तंत्रप्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटु) करणार आहे. उत्पादित झालेला पक्का माल उत्पादनाला बाजारपेठही मिळवून देण्याची जबाबदारी या संस्थांनी घेतली आहे. अशा पद्धतीने एखादे गाव दत्तक घेण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे दिसून येते. यामधून गाव हे स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होणार असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि देशात एक नवा आदर्श निर्माण होणार असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले.
या गावामध्ये ३१ मागासवर्गीय कुटुंब व ४९ सर्वसाधारण वर्गातील कुटुंब अशी एकूण ८० कुटुंब आहेत. या सर्वांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी आंबडवे गाव आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी दत्तक घेण्याची घोषणा मिलिंद कांबळे यांनी केली. आंबडवे गावाला भेट देते वेळी, गावातील घरांचे नुकसान झाल्यामुळे डिक्की संस्थेने सर्व घरासाठी ३४,६६८ चौरस फूट सिमेंट पत्रे, तर प्रत्येक घरासाठी ४३३ चौरस फूट पत्रे आणि इतर साहित्य ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच प्रत्येक घराला जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले तसेच अनेक दिवसांपासून या भागात वीज नसल्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी सोलर एलईडी दिवेही देण्यात आले.
खादी व ग्रामोद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी खादी विलेज इंडस्ट्री पूर्ण मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पश्चिम विभागाचे उपकार्यकारी अधिकारी संजय हेडाव यांची समन्वयक म्हणून तत्काळ नियुक्ती केली आहे. तसेच श्री. हेडाव खादी मंडळाच्या महाराष्ट्राच्या अधिकार्यांसह जुलैच्या पहिल्या आठवड्यात आंबडवे गावाला भेट देऊन प्राथमिक अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीची सुरुवात करणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटु) चे कुलगुरू डॉ. वेदला राम शास्त्री यांनी या गावाच्या विकासासाठी विद्यापीठाचे स्कील व उद्योजकता विकास विभाग पूर्ण सक्रियपणे काम करेल असे सांगितले. यासाठी विद्यापीठाकडून दोन प्राध्यापकांची प्रा. संपत खोब्रागडे व प्रा. वर्हाडकर यांची समन्वयक म्हणून तत्काळ नियुक्ती केली. यावेळी तेही उपस्थित होते. यावेळी मंडणगडचे बीडीओ आर.एम. दिघे, आंबडवे गावाचे शिक्षक व समन्वयक नरेन सपकाळ, डिक्की टीमचे प्रमुख पदाधिकारी अविनाश जगताप, अनिल होवाळे, सीमा कांबळे, अमित औचरे, मैत्रेयी कांबळे उपस्थित होते.