सोलापूर: जम्मू काश्मीरमध्ये पूलवामा विभागातील बंडजू या भागांमध्ये भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. हा जवान बार्शी तालुक्यातील पानगाव येथील आहे. सुनील काळे असे नाव या शहीद झालेल्या जवानाचे असून ते केंद्रीय राखीव दलांमध्ये (सीआरपीएफ) कार्यरत होते.
सुनील काळे हे शहीद झाल्याची बातमी बार्शी तालुक्यात समजताच बार्शी शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. आज पहाटे जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजू या गावात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली असता सीआरपीएफच्या तुकडीने बंडजू परिसराची पाहणी करून अतिरेकी लपलेल्या ठिकाणी घेराव घातला. दरम्यान, अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले. यावेळी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान सुनील काळे हे शहीद झाले.