# अंबाजोगाईतील “स्वाराती” वैद्यकीय महाविद्यालयात पहिले प्लाझ्मा दान.

पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव प्रशांत जोशी यांनी केले पहिले प्लाझ्मा दान

अंबाजोगाई:  स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेस पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सचिव प्रशांत जोशी यांनी प्लाझ्मा दान केल्यामुळे प्लाझ्मा दानाचा प्रयोग यशस्वी यशस्वी झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जून महिन्यात अंबाजोगाई येथे झालेल्या पत्रपरिषदेत जाहीर केल्याप्रमाणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या भरगोस निधीमुळे तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सुचनेनुसार अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेत प्लाझ्मा थेरपीतील प्लाझमा दानाचा पहिला प्रयोग यशस्वीरीत्या करण्यात आला.

आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
स्वाराती वै. महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेत कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीसाठी अद्ययावत उपकरणे जून महिन्यामध्ये उपलब्ध झाली आहेत. जगात कोरोनाच्या महामारीविरोधात विविध उपचारपद्धतीचा अवलंब केला जात आहे, त्यापैकी प्लाझ्मा थेरपी ही एक महत्वाची उपचार पद्धती आहे.  कोरोना रोगातून बरा झालेला रुग्ण याकरिता २८ दिवसांनंतर संपूर्ण तपासणीनंतर आपला प्लाझ्मा दुस-या कोरोनाग्रस्त रुग्णासाठी स्वेच्छेने देऊ शकतो. या प्लाझ्मावर विशिष्ट प्रक्रिया करुन प्लाझ्मातील रक्तद्रव कोरोनाबाधित रुग्णाला देवून तो रुग्ण बरा करण्यासाठी या थेरपीचा उपयोग होतो.

अंबाजोगाईसारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. राकेश जाधव (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. शिवाजी बिरारे (विभागप्रमुख शरीर विकृती शास्त्र), डॉ. एस.एस. चव्हाण (सहयोगी प्राध्यापक), डॉ. विनय नाळपे (प्रभारी अधिकारी रक्तपेढी), डॉ. आरती बर्गे, डॉ. नारायण पौळ, डॉ. सुजीत तुम्मोड व रक्त प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ जगदीश रामदासी, श्रीमती सोजर गालफाडे, सय्यद मुश्ताक, किरण चव्हाण, परमेश्वर मोरे, शशिकांत पारखे यांना यश झाले आहे. रक्तातील प्लाझ्मा विभक्त करण्यासाठी अफेरेसीस मशीनचा उपयोग होतो.

प्लाझ्मा दान करण्याचे दायित्व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सचिव प्रशांत जोशी यांनी स्वत:हून दाखवले. १४ जुलै रोजी प्रशांत जोशी यांनी प्लाझमा दान केले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी समाजातील जास्तीत जास्त कोरोनातून ब-या झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे व कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी प्लाझ्मा रूपी संजीवनी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *