बीड: इयत्ता 10 वी चा निकाल घोषित झालेला असून बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी या 6 शहरामधील विद्यार्थ्यांना इतर शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आणि या संस्थांच्या प्रवेशाची अंतिम तारीख जवळ आलेली असल्यामुळे इयत्ता 10 वीतील टिसी व मार्क मेमो काढणेसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना परवानगी देण्यात येत आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी हे 6 शहरे 10 दिवसांकरिता 12 पासून दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद असल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत.
इयत्ता 10 वी पास विद्यार्थी व त्यांचे एक पालक यांना फक्त टिसी व मार्क मेमो या ६ शहरामधील शाळेमधून काढणेसाठी परवानगी असेल. या शहरांमध्ये प्रवेश करण्यास व शाळेमध्ये जाणे यासाठी पासची आवश्यकता असणार नाही, परंतु शाळेचे ओळखपत्र व पालकांचे आधारकार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असेल. संबंधित शाळेचे शिक्षकांना यासाठी वेळेच कोणतेही बंधन न ठेवता 24 तास दररोज शाळेमध्ये थांबून कामकाज करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 10 वी पास विद्यार्थी, पालक हे शाळेमध्ये आल्यानंतर एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करुन कोविड-19 विषयक सामाजिक अंतर पाळणे बाबत प्रत्येक शाळेने सक्त सूचना द्याव्यात आणि त्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची आहे.