# मुंबई विमानतळाची मालकी जाणार अदानी समूहाकडे?; ७४ टक्के हिस्सा करणार खरेदी.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समूहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली. दरम्यान, आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखभलीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समूहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अदानी समूहाचा जीव्हीके समूहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील ७४ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समूहाकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक मानले जाते. मुंबई विमानतळातील हिस्सा खरेदी केल्यानंतर देशातील ६ विमानतळं अदानी समूहाकडे असणार आहे. तसंच यानंतर अदानी समूह देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ‘प्रायव्हेट एअरपोर्ट ऑपरेटर’ बनणार आहे. सध्या दिल्ली, हैदराबाद अशा विमानतळांच्या देखरेखीचं आणि हाताळणीचं काम करणारे जीएमआर समूह देशातील मोठे ‘प्रायव्हेट एअरपोर्ट ऑपरेटर’ आहे. मुंबई विमानतळाच्या अधिग्रहणानंतर अदानी समूहाला नवी मुंबईत उभारल्या जात असलेल्या विमानतळाचंही कंत्राट दिलं जाणार आहे.

सवलतीच्या करारावर स्वाक्षऱ्या:

लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क २०१९ साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समूहाला देण्यात आले होते. याच निर्णयाची अंमलबाजवणी करण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले असून जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममधील विमानतळाचे हक्क अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सहापैकी लखनौ, अहमदाबाद आणि मंगळूरू विमानतळाचे हक्क अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असून लवकरच तेही अदानी कंपनीला देण्यात येणार आहेत. लखनौ, अहमदाबाद आणि मंगळुरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमान तळांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *