नागपूर: नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशीही होम कोरंटाईन झाले होते.
नागपूर शहरात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आता खुद्द आयुक्तांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आले आहे. तुकाराम मुंडे यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मला सध्या कुठलीही लक्षणं नाहीत त्यामुळे मी होम कोरंटाईनचा निर्णय घेतला आहे. शासनाचे सर्व नियम मी पाळतो आहे. गेल्या १४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया टेस्ट करून घ्यावी. मी घरूनच काम करणार असून, आपली कोरोना विरुद्धची लढाई सुरू आहे. यामध्ये आपण नक्की जिंकू”. असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.