पुणे: मान्सूनचा सोमवारपासून पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थानच्या उर्वरित भागासह पंजाब, हरियाणाचा काही भाग, दिल्ली, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातून मान्सून परतीचा प्रवास करण्यास सुरू करणार आहे, अशी माहिती भारतीय हवामानाशास्त्र विभागाने दिली. दरम्यान, राज्यातील मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तसेच विदर्भासह पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, या भागात 30 सप्टेंबरपर्यंत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यासह देशात गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून मुक्काम ठोकून असलेल्या मान्सूनने आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. पश्चिम राजस्थानपासून सोमवारी मान्सूनने परतीच्या प्रवासास सुरूवात केली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात उत्तरेकडे पंजाब, हरियाणा, दिल्ली, छ्त्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशाच्या बहुतांश भागातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे. महाराष्ट्रातून 8 ते 10 ऑक्टोबरपर्यत मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करणार आहे. साधारणपणे दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीपासून परतीचा मान्सून बरसण्यास सुरूवात होईल, असा अंदाज भारतीय हवामानसशास्त्र विभागाने वर्तविला आहे.