मुंबई: अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघींनाही आज समन्स बजावले आहे. दाखल गुन्ह्यात कंगनाला सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी तर रंगोली हिला मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
कंगना व तिच्या बहिणीविरुद्ध मुंबई पोलिसांनी १२४ अ (देशद्रोह) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी या दोघींना बोलावण्यात आले आहे. आज याबाबत समन्स बजावण्यात आले असून दोघींनाही प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांत परस्परांविषयी द्वेष उत्पन्न होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट करत असल्याच्या आरोपांप्रकरणी कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंडेल हिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी दिले होते. बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी अॅड. रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली असता त्यावर हे आदेश दिले गेले होते. न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्वीट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्याच दिवशी कंगना व रंगोली यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.