# महावितरणच्या ‘गो-ग्रीन’मध्ये पुणेकरांची राज्यात आघाडी.

गेल्या सात महिन्यांत पर्यावरण स्नेहींमध्ये 19 हजारांनी वाढ

पुणे:  पर्यावरणस्नेही पुणेकर वीजग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणचे राज्यभरातील 1,79,587 ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 43,974 वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यानंतर कल्याण परिमंडल -18,634 व भांडूप परिमंडलातील 18,089 ग्राहकांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या सात महिन्यांत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे परिमंडलात तब्बल 18,999 ग्राहकांची वाढ झाली आहे. याच कालावधीत एकूण 16 परिमंडलांमध्ये ‘गो-ग्रीन’ योजनेत 75,669 ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. त्यात पुणेकरांचा वाटा देखील सर्वाधिक आहे. महावितरणची पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे.

महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये  वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तत्काळ  ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील 24,696 तर पिंपरी चिंचवड शहरातील 12,779 तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, हवेली व वेल्हे तालुक्यातील 6499 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे व पर्यावरणपूरक कामात योगदान दिले आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’  योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी  क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या
https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती
www.mahadiscom.in  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *