# आता यापुढे एमआयएम सोबत युती नाही -प्रकाश आंबेडकर.

नांदेड: लोकसभा निवडणुकीत एमआयएमला घेऊन आम्ही लढलो, परंतु विधानसभा निवडणुकीत अवास्तव जागेची मागणी केली गेली. त्यामुळे युती तोडणे भाग पडले, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुढील काळात एमआयएमसोबत युती होणे कदापीही शक्य नसल्याचे जाहीर केले. मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत 40 जागा देऊ असे सांगितले होते. परंतु एमआयएमकडून शंभर जागेची मागणी केली जाऊ लागली, तसे केले असते, तर भाजपला अधिक लाभ मिळाला असता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुढील काळात होणाऱ्या कोणत्याच निवडणुकीत एमआयएम सोबत युती होणार नसल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीने कारखानदार उमेदवार दिला. पदवीधरसंबंधी या पक्षाची भूमिकाच नाही. केवळ पैसा या जोरावर ते निवडून येत आहेत. पदवीधरच्या प्रश्नावर खुली चर्चा करण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पुढे यावे, असे माझे आव्हान असेल, यासाठी खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असेही ऍड. आंबेडकर म्हणाले.

या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारास विजयी करा, सगळे पदवीधरांचे प्रश्न निकाली काढू, यासाठी सर्व घटकांनी साथ द्यावी, असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले. यावेळी वंचितचे उमेदवार पांचाळ, राज्य प्रवक्ते फारूक अहेमद, शिवा नरगले, प्रशांत इंगोले, संघरत्न कुर्हे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *