जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील घटना
जालना: शिवसेनेचे अंबड तालुका उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर आज पहाटे 5-6 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून शस्त्रांचा धाक दाखवून रोख 1 लाख 40 हजार रुपये आणि 39 तोळे सोन्याचे दागिने, असा 21 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे औरंगाबाद- सोलापूर महामार्गालगत खटके वस्तीवर पाच चोरट्यांनी शिवसेना उपतालुका प्रमुख श्रीमंत खटके यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. एकाने हॉलमध्ये घुसून अन्य दोघांनी कपाट असलेल्या खोलीत जाऊन खोलीत झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावला व कपाटातील मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचा राणीहार साडेचार तोळे, दोन गंठन साडेतीन तोळे, १२ अंगठ्या पंधरा तोळे, कानातले जोड- ६ पाच तोळे, ब्रेसलेट तीन तोळे, नेकलेस अडीच तोळे, बांगड्या पाच तोळे व आजीच्या गळ्यातील गहू पोत एक तोळा असे मिळून साडे एकोणचाळीस तोळे सोने व रोख १ लाख ४० हजार असा मिळून २० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन येऊन पाहणी केली.