जालना: भाजप फक्त १०० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे त्यावर विश्वास ठेवू नका, थापाड्यांचा व महाराष्ट्राला बदनाम करणारा हा पक्ष असून दोन महिनेच काय आता पुढील पंचवीस वर्षे हा पक्ष सत्तेवर येत नाही. ‘सत्ता मिळणार… सत्ता मिळणार’ असे गाजर कार्यकर्त्यांना दाखवावे लागते, असा पलटवार महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता केला.
बदनापूर तालुक्यातील पदवीधरांचा मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजप हा जातीत जातीत भांडणे लावण्याचे काम करून मोजक्या लोकांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे, बहुजनांकडे सत्ता जायला नको या मानसिकतेने काम करत १०० टक्के राजकारण करतो हे राजकारण करत असताना खोटे बोल पण रेटून बोल असे त्यांचे राजकारण असते ते आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांना ‘सत्ता मिळणार.. सत्ता मिळणार…’ असे गाजर कार्यकर्त्यांना दाखवावे लागत आहे वास्तविक पाहता आता त्यांना सत्ता मिळणारच नसल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाण साधला. ते म्हणाले दोन महिनेच काय कधीच आता तुमची सत्ता येत नाही. आहे तेच लोक सांभाळण्यासाठी सत्ता येणार असे म्हणावे लागत असल्याचे त्यांनी दानवे यांचे नाव न घेता, त्यांच्या दोन महिन्यात सत्ता येणार या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच सरधोपट हिशेब लावला तर शिवसेनेचे पन्नास, राष्ट्रवादीचे पन्नास व काँग्रेसचे पन्नास आमदार निवडून येतात त्यामुळे भाजपने सत्तेची स्वप्न पाहू नये. सत्ता गेल्यामुळे या मंडळीकडून महाराष्ट्राला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.