# पदवीधर निवडणूक: गर्दीस प्रतिबंध अन् कायदा सुव्यवस्थेचे पालन करा.

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी घेतला निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा

औरंगाबाद: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोविडच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाय योजना सज्ज ठेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिले.

आज गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी. जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मिना मकवाना आदींसह विभागातील सर्व पोलीस अधीक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते.

यावेळी श्री.सिंह यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडावी. प्रामुख्याने सर्व मतदान केंद्रांवर कोविडच्या पार्श्वभूमीवर पूरक व्यवस्था ठेवत सामाजिक अंतर राखून मतदान प्रक्रिया पार पाडण्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य पथक सज्ज ठेवावेत, असे निर्देशित करून सर्व केंद्रावर सॅनिटायजर, गर्दीस प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना श्री.सिंग यांनी संबंधितांना दिल्या. तसेच सर्व मतदारांना सॅनिटायजर देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात यावा. सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे मतदान, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, नियमबाह्य गोष्टी घडणार नाहीत यासाठी खबरदारी घ्यावी. आक्षेपार्ह काही घडल्यास अशा प्रकारच्या घटनेची तातडीने आयोगास माहिती द्यावी. नकारात्मक गोष्टी प्रसारीत होणार नाहीत, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी घडणार नाहीत, यासाठी यंत्रणांनी खबरदारी घेण्याचे निर्देश श्री.सिंह यांनी यावेळी दिले. मतदान प्रक्रियेबाबत मतदारांना पुरेशी माहिती यंत्रणांनी देऊन जनजागृती करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच मतदान प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही श्री.सिंह यांनी यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर म्हणाले औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याबाबात विविध माध्यमांव्दारे जनजागृती केली जात आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असून यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, औरंगाबाद विभागात एकूण 3 लाख 73 हजार 166 पदवीधर मतदार असून त्यात पुरूष पदवीधर मतदार 2 लाख 86 हजार 249 तर महिला पदवीधर 86 हजार 909 आहे. तर सर्वाधिक एकूण पदवीधर मतदार संख्या ही औरंगाबाद जिल्ह्याची असून 1 लाख 63 हजार 79, जालना-29 हजार 765, परभणी- 32 हजार 715, हिंगोली-16 हजार 794, नांदेड-49 हजार 285, बीड-63 हजार 436, लातूर- 41 हजार 190, उस्मानाबाद-33 हजार 632 इतकी आहे. औरंगाबााद विभागात एकूण 813 मतदान केंद्र आहेत. त्यात औरंगाबाद-206, जालना-74, परभणी-78, हिंगोली-39, नांदेड-123, लातूर-88, उस्मानाबाद-74, बीड-131 मतदान केंद्र आहेत. औरंगाबाद विभागात एकूण 937 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगून श्री.केंद्रेकर यांनी अधिकारी-कर्मचारी व्यवस्थापन, विविध पथके, कक्षाचे कामकाज तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात झालेल्या पूर्वतयारीबाबत व कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय करण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *