पुणे: पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. तसेच श्री.लाड यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. या मतदार संघाचे नेतृत्व आमदार चंद्रकांत पाटील करत होते. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विशेष म्हणजे गेली 20 वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेली ही जागा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून घेण्यात यश मिळवले आहे.
एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते, निवडणुकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.