पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० रविवार, १४ मार्च २०२१ रोजी, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०, शनिवार, २७ मार्च २०२१, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०, रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
या अगोदर राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ११ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० (१ नोव्हेंबर २०२०) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० (२२ नोव्हेंबर २०२०) होणार होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग व मराठा आरक्षण यामुळे परीक्षा रखडल्या होत्या. आता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवड्यामध्ये अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे.