सदस्य म्हणून आ.बालाजी कल्याणकर, संतोष पांडागळे यांच्यासह सात जणांची नियुक्ती
नांदेड: जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय या ठिकाणच्या अभ्यागत मंडळाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने नुकतीच केली असून अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर, दै.सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न असलेल्या रूग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात येते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून नांदेड दक्षिणचे आ.बालाजी कल्याणकर, पत्रकार संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ, डॉ.करूणा जमदाडे, श्रीमती कल्पना शिरपुरे, दिगांबर पवार, रोहिदास जाधव, कैलास धोत्रे, डॉ.दि.बा.जोशी यांचा समावेश आहे. अभ्यागत मंडळाची नव्याने स्थापना झाल्यामुळे जिल्हाभरातून डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात येणार्या रूग्णांना चांगल्या सेवासुविधा पुरविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्त केल्याबद्दल अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहे.