नांदेड विमानसेवेनी जळगाव व अहमदाबादला जोडल्या जाणार
नांदेड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानांच्या फेर्यांमध्ये एका बाजूस कपात सुरु असताना नांदेडहून मात्र आता दररोज विमानाने मुंबईला जाता येणार आहे. या सोबतच नांदेड शहर हवाई मार्गाने जळगाव आणि अहमदाबादला 2 मार्च पासून जोडल्या जाईल. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे नांदेडला नव्याने ही विमानसेवा सुरु होणार आहे.
नांदेड येथे उत्तम दर्जाचे विमानतळ असून या विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा उपलब्ध आहे. येथील गुरुद्वारामुळे जगभरातील भाविक मोठया प्रमाणात नांदेडला येत असतात. यापूर्वी नांदेडहून मुंबई,हैद्राबाद, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी विमानसेवा सुरु होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ विमानसेवा पूर्णतः खंडित केल्यानंतर ट्रुजेट या कंपनीने हैद्राबाद-नांदेड-मुंबई व मुंबई-नांदेड-हैद्राबाद ही परतीची सेवा असलेली मंगळवार, बुधवार, गुरुवार या आठवड्यातील तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली.
नांदेडमधील हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून मुंबईला जाण्यासाठी दररोज विमान असले पाहिजे अशी आग्रही भूमिका पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतली. त्यांच्याच पुढाकारातून आता आठवड्यातील उर्वरित चार दिवसी म्हणजेच सोमवार, शुक्रवसार, शनिवार व रविवार या दिवसीही नांदेडकरांना विमानाने मुंबईला जाता येणार आहे. चार दिवस नव्याने सुरु होणार्या या विमानाने नांदेडच्या प्रवाशांना जळगाव आणि अहमदाबाद असाही प्रवास करता येणार आहे.
यापूर्वी सुरु असलेली ट्रुजेटची आठवड्यातील तीन दिवसांची विमानसेवा तशीच राहणार असून उर्वरित चार दिवसात ट्रुजेटचे विमान सकाळी 9.45 वाजता अहमदाबादहून निघून जळगावला 11.5 मिनीटाला पोहोंचणार आहे. 11.30 मिनिटानी जळगावहून निघून हे विमान 12.45 मिनिटाला मुंबईला पोहोंचेल. मुंबईहून 1.25 मिनिटाला निघणारे हे विमान नांदेड येथे 3 वाजता येईल. नांदेड येथून 3.30 मिनिटांनी हे विमान मुंबईकडे रवाना होईल. मुंबई विमानतळावर 5 वाजता पोहोंचून 5.30 वाजता जळगावांकडे उड्डान करेल. 7.05 वाजता जळगावहून निघून रात्री 8.25 मिनिटाला अहमदाबाद येथे विमान पोहोंचेल. या नव्याने सुरु होणार्या विमानसेवेमुळे दररोज मुंबईला जाण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून ही विमानसेवा सुरु होणार असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.