राज्य शासनाच्या व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर अहवाल उपलब्ध
मुंबई: राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे विधिमंडळात सादर करणार आहेत. पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in तसेच http://mls.org.in, https://www.maharashtra.gov.in, https://www.finance.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिली आहे.
दरवर्षी राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस अगोदर ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे प्रकाशन विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते. 1 मार्च, 2021 पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21 हे प्रकाशन दोन्ही सभागृहांमध्ये 5 मार्च, 2021 रोजी सादर केले जाणार आहे.
यंदाच्या वर्षी सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विधिमंडळात वित्तमंत्र्यांनी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21’ सादर केल्यानंतर पत्रकार तसेच अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजिटल स्वरुपात वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.