# दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी ताब्यात.

जालन्यातील प्रकार; दोन पोलीस कर्मचारीही ताब्यात

जालना: ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी, पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जालना उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आज गुरूवारी ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

तक्रारदार यांच्यावर काही दिवसांपूर्वी तालुका जालना पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्याकडे होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रूपयांची लाच मागण्यात आली. याप्रकरणी तडजोडीअंती तीन लाख रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पुणे येथून एक पथक जालना शहरात दाखल झाले.

या पथकाने दोन दिवस या तक्रारीची पडताळणी करून खात्री केली. त्यानंतर गुरूवार, २० मे रोजी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कदीम जालना पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संतोष निरंजन अंभोरे याला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. तसेच संशयित उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर, पोलीस कर्मचारी विठ्ठल पुंजाराम खार्डे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकातील पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, कर्मचारी नवनाथ वाळके, किरण चिमटे, दिनेश माने हे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *