मुंबई: मराठीच्या जनजागृतीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखविण्यात येत आहे. याच ठिकाणी अभिजात मराठीची महती सांगणारे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या दालनाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, अवर सचिव अजय भोसले, उर्मिला धादवड आदी उपस्थित होते.
नुकतेच नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हा लघुपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात सर्व लोकप्रतिनिधींसाठी विधानभवन परिसरात हा लघुपट दाखविण्यात आला. आजपासून मंत्रालय परिसरातील अधिकारी आणि अभ्यागतांना या लघुपट व प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.