# मा. मुख्यमंत्री महोदयांना अनावृत्त पत्र…

 

प्रति,
मा. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

नमस्कार…
गेल्या महिना दीड महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र ठप्प आहे. देशव्यापी लॉकडाऊन असल्यामुळे तसे असणे स्वाभाविकही आहे. पण मागच्या काही दिवसात सामान्य माणसांचे जे हाल होत आहेत, ते चित्र खूप अस्वस्थ करणारे आहे. परवा तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. असा संवाद तुम्ही अधूनमधून साधत आहात. लोकांशी बोलत आहात हे ठीकच आहे. तुमच्या नेतृत्वावर तमाम महाराष्ट्राचा विश्वास आहे. तो विश्वास अनेकजण आपापल्या परीने व्यक्तही करत आहेत, पण याचा अर्थ असा होत नाही की, सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे ते लोकांनी स्वीकारले आहे. तुमची तळमळ, तुमची कमालीची संवेदनशीलता, निर्णयक्षमता या सगळ्या बाबी महत्त्वाच्या असल्या तरी त्यामुळे आपण खूप निर्णायक काम केले आहे असे म्हणता येते का?

अर्थात कोरोनामुळे संपूर्ण जग बाधित झाले आहे. अमेरिका, फ्रान्स, इटलीसह अनेक प्रगत राष्ट्रे या विषाणूचा विळख्यात अडकली आहेत. भारतातही हे संकट भयावह रूप धारण करत आहे. पण महाराष्ट्राला मात्र सर्वाधिक इजा झाली आहे. मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर, सांगली, हिंगोलीसह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात भय आणि घोर निराशा पसरली आहे. आर्थिक विकास वगैरे बाजूला ठेवू; पण सध्या आत्मविश्वासाने जगण्याचे बळही बहुसंख्य लोकांनी गमावले आहे. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षात हे सगळे घडत आहे, हे खूप दुर्दैवी आहे. ज्या महाराष्ट्राचा इतिहास खूप थोर आहे. देशात आणि जगात ज्या राज्याचा मोठा लौकिक आहे. त्या राज्यातील जनता सुंदर, संपन्नतेचे स्वप्न गमावून बसली आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ज्या राज्याने आपला ठसा उमटवला ती सर्व क्षेत्रे आजघडीला निर्जीव झाली आहेत. पुढे काय होणार? याविषयी कोणतेच खात्रीलायक उत्तर लोकांना मिळत नाहीय. राज्याचे प्रमुख म्हणून आपण लोकांशी संवाद साधत आहात, पण त्या संवादात अलीकडे आश्वासकता दिसत नाहीय. दिसतोय केवळ संभ्रम.

मागच्या सरकारच्या तुलनेत अत्यंत समंजस नेतृत्व म्हणून लोकांनी आपलं वारंवार कौतुक केलं आहे. हे कौतुक किंवा ही सहानुभूती नक्कीच महत्त्वाची असली, तरी या कौतुकाचे रूपांतर कधी विरोधात होईल हे सांगता येत नाही. एकतर केंद्रातले सरकार तुम्हाला अनुकूल नाही आणि दुसरे म्हणजे तुम्ही ज्या पक्षांचा हात हातात घेऊन राज्याचा गाडा हाकत आहात त्या पक्षांची वैचारिक भूमिकाही तुम्हाला मानवणारी नाही. विरोधी पक्ष प्रबळ आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षा लपून नाहीत. अशावेळी आपल्याला अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करावे लागेल. जरावेळ या राजकीय गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तरी कोरोनामुळे तुमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागू नये, याची काळजी मात्र घ्यायला हवी. कारण ज्या वेगाने आपली हानी होत आहे ती पाहता तत्काळ काही कठोर पावले उचलण्याची आता गरज आहे आणि त्याचवेळी गोरगरिबांना जगण्याची उमेद देण्याचीही आवश्यकता आहे.

महोदय,
कोरोनाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परिणाम काय आणि कसे होणार आहेत? याविषयी इथे विस्ताराने बोलण्याचे काही कारण नाही; पण एवढे मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की, आपली किमान दोन-तीन दशके तरी पीछेहाट निश्चित आहे. आपण पुढील काही वर्ष नव्या नोकर भरतीवर बंदी घातली आहे. असा निर्णय घेणे आवश्यक असेलही, पण अशावेळी आपली नवीन पिढी आपल्या भविष्याचा शोध घेऊन पाहते आहे, त्या पिढीचे आपण काय करणार आहोत? रोजगाराच्या संधी निर्माण होणार नसतील तर तरुणाईने नेमके काय करायला हवे? ज्या तीव्र गतीने देशभर उलथापालथी होत आहेत ते पाहता भविष्यात काही उद्रेक होणारच नाही असे कसे म्हणता येईल? त्यापेक्षा निवृत्तीचे वय कमी करून नव्या मुलांना संधी देणे अधिक योग्य ठरेल.

कोरोनामुळे समाजात उघडउघड जातीय आणि धार्मिक तणाव वाढला आहे. दुर्दैव हे की, अशा जैविक संकटाच्या काळातही लोक आपापल्या धर्माच्या अस्मिता आणि टोकाचा द्वेष कसा काय राखून ठेवतात? मूठभर लोकांचा विखारी प्रचार संपूर्ण समाजाला बाधित करतो आणि यातून सामाजिक संशय तीव्र होत जातो. त्यामुळे अशा अफवा आणि चिथावणीखोरांना वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे. पालघर येथे निष्पाप साधूंची हत्या झाली. या घटनेने महाराष्ट्राची नाचक्की झाली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर पॅनलिस्ट विद्वानांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे खूप धक्कादायक आहे. शिवाय भविष्यात लोक एकमेकांकडे संशयाने पाहतील. हा संशय जीवघेणा ठरु शकतो. यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. गावोगावी छुप्या दंगली घडतील. असे घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेला आणि समाजाला आपण विश्वास द्यायला हवा.

श्रीमंत आणि सर्वसामान्य हा भेद सरकारच्या अनेक निर्णयातून स्पष्ट दिसतो आहे. वाधवान कुटुंबाला हवापालटासाठी गृह मंत्रालयाचे सचिव प्रवासाचा पास देतात आणि शेकडो किलोमीटरचा त्यांचा प्रवास विनाअडथळा पार होतो. किंवा विदेशात अडकलेल्यांना अत्यंत सन्मानाने आणले जात आहे. ‘वंदे भारत’ सारखी मोहीम राबवून त्यांना घरी पोहोचवले जात आहे. अर्थात याविषयी तक्रार असण्याचे काही कारण नाही; पण त्याचवेळी गाव शहरात अडकलेल्या आणि सर्वार्थाने पराभूत झालेल्या गोरगरिबांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची आहे?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि परराज्यात जे मजुरांचे लोंढे परतताना दिसत आहेत, त्यांची हतबलता, त्यांचे दुःख पाहवत नाहीय. सर्वस्व गमावलेले त्यांचे स्थलांतरित चेहरे आपण पाहिलेच असतील. अर्थात आपापल्या गावी गेल्यानंतर त्यांचे सगळेच प्रश्न मिटणार आहेत का? तर नाही. पण किमान शहरात जी त्यांची घुसमट होत आहे. अपमान होत आहे. त्यापासून तरी किमान त्यांची सुटका होईल. हजारो किलोमीटरचा प्रवास दिवस-रात्र करून त्यांच्या पायाची कातडी सोलून निघाली आहे. सगळ्या महामार्गावर हे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अंगाखांद्यावर लहान मुलांचे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांचे ओझे घेऊन निघालेले हे अभागी जीव पाहिले की भयंकर यातना होत आहेत. महिलांची दीनवाणी अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. जगण्यासाठी एवढी मोठी किंमत चुकवावी लागते? देशाच्या फाळणीनंतर असे स्थलांतरितांचे लोंढे जगाने पाहिले होते. सध्या त्याहून अधिक भीषण घडत आहे. एवढ्या वेदना सहन करून या लोकांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. पोटात अन्नपाणी नाही आणि खिशात पैसे नाहीत. आणि तरीही ह्या लोकांना आपल्या गावी परतायचे आहे. ते का? कारण त्यांना सरकार म्हणून आपण मानसिक, भावनिक आणि आपलेपणाचा प्रतिसाद देऊ शकलो नाही, हे वास्तव नाकारता येईल काय? केवळ क्वारंटाईन करून तात्पुरता निवारा देणे आणि दोन वेळा खिचडी खाऊ घालणे म्हणजे आपण आपले दायित्व पूर्ण केले असे होत नाही. या सर्व मजुरांना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वीच खरेतर आपापल्या गावी परत जाण्याची संधी द्यायला हवी होती किंवा पर्यायी व्यवस्था तरी करायला हवी होती; पण तसे घडले नाही. याला जबाबदार कोण?

आता तर आंतरराज्य, जिल्हा आणि गावबंदीचे असंख्य अडथळे आहेत. दळणवळण पूर्ण थांबले आहे. त्यामुळे रात्री अपरात्री अपराधभावाने आड मार्गाने किंवा रेल्वे रुळावरून जाणारे अनेक जत्थे आपल्याला दिसत आहेत. परवा औरंगाबाद जवळ सोळा निष्पाप मजुरांना रेल्वेने चिरडले. रात्रभर प्रवास करून थकल्यामुळे रुळावरच झोपलेल्या मजुरांची ही झोप काळझोप ठरली. त्यांचा दोष काय? त्यांच्या मृत्यूची जबाबदारी आपण कुणावर टाकणार आहोत? या घटनेवरही उलट-सुलट बोलणारे लोक आहेतच; पण आपण मुख्यमंत्री म्हणून अत्यंत संवेदनशीलतेने यासंदर्भात व्यक्त व्हायला हवे असे मला वाटते. ‘कोरोना परवडला, पण लॉकडाऊन नको’ असे लोकांना का वाटत आहे?

आपण अहोरात्र मेहनत घेत आहात हे खरेच; पण तरीही प्रशासकीय स्तरावर नियोजनाचा अभाव दिसत आहे. मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार आणि इतर अधिकारी ही संपूर्ण साखळी नियोजनबद्ध असायला हवी. रोजगार गमावलेल्या आणि भयभीत झालेल्या कुटुंबापर्यंत मदतीचे हात पोहोचायला हवेत. भविष्यातल्या जगण्याचीही त्यांना शाश्वती द्यायला हवी.

आणखी एक प्रश्न सतावतोय. जेमतेम दीड महिन्यात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी कशी झाली? जर झाली नसेल तर मग दारूतून मिळणाऱ्या महसुलाची आपल्याला गरज का पडली? अशा संकटकाळात दारू ही जीवनावश्यक वस्तू झालीच कशी? हा सल्ला आपल्याला कुणी दिला? आणि आपण तो का मानला? मागच्या काही दिवसात दारूच्या दुकानासमोर ज्या अभूतपूर्व रांगा लागल्या ते पाहता या घटनेचे अनेक दूरगामी परिणाम संभवतात. लॉकडाऊनमुळे घरात आधीच अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात दारू पिणाऱ्या पुरुषांची अधिक भर पडली तर कौटुंबिक हिंसेच्या अनेक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जणूकाही संपूर्ण संकटावर आपण आता मात केली आहे आणि त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी दारू प्यायलाच हवी, अशा आविर्भावात लाखो लोक पहाटेपासून रांगेत उभे राहिले. प्रागतिक महाराष्ट्रातले हे दुर्दैवी चित्र आपणास खटकले नाही का? अनेक टीव्ही वाहिन्यांवर वारंवार ‘दारू दुकाने सुरू होणार ‘ असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवण्यात आली. पत्रकारितेचे नैतिक भान गमावलेले बिनडोक पत्रकार दारूच्या रांगेत उभे असलेल्यांच्या मुलाखती घेत आहेत. ‘आता कसं वाटतंय? ‘ असे प्रश्न विचारले जात आहेत. आणखी एका घटनेने मी अस्वस्थ झालो. दारूच्या दुकानात प्राध्यापकांची समन्वयक म्हणून काही ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. हा निर्णय कुणी आणि कसा घेतला? अशा घटनेचे अनेक नकारात्मक परिणाम समोर येतात. पत्रकारितेच्या आणि विचाराच्या क्षेत्रातला हा मूल्यऱ्हास चिंताजनक आहे. म्हणून तुम्ही या विषयी काय सांगाल? दारू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर जर राज्य चालणार असेल तर मग लॉकडाऊन हवाच कशाला? चोवीस तास वाईन शॉप आणि मुंबईसह महाराष्ट्राची नाईट लाईफ सुरू करायला काय हरकत आहे?

अनेक दवाखाने बंद आहेत. वारंवार आरोग्यमंत्र्यांनी सूचना देऊनही खाजगी व्यवसाय करणारे बहुतेक डॉक्टर दवाखाने उघडायला तयार नाहीत. अशा असंवेदनशील डॉक्टरांचे परवाने रद्द करायला हवेत. सध्या डॉक्टर, पोलिस आणि प्रशासनावर प्रचंड मोठा ताण आहे, हे खरे आहे. अपुरे मनुष्यबळ ही आपली मोठी समस्या आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात स्वेच्छेने सेवा देऊ इच्छिणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांशी शासनाला जोडून घेता यायला हवे. एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांचाही मोठा उपयोग आपल्याला होऊ शकतो. कारण येणारा काळ हा अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. लॉकडाऊन हा एकमेव पर्याय यावर असू शकत नाही. आपल्याला या संकटातही जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. शासन प्रमुख म्हणून आपण यासंदर्भात लोकांना विश्वास द्यायला हवा. आज ना उद्या आपण सर्वजण या संकटातून नक्कीच मुक्त होऊ, पण सध्याचे भय कमी व्हायला हवे.

अन्य देशात लोक स्वतःची आणि इतरांची काळजी घेत कामाला लागले आहेत. स्वतःचे जगणे ते पूर्ववत करू पाहत आहेत. आपल्यालाही तसेच करावे लागेल. सध्या सर्व उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. अनेकांनी रोजगार गमावला आहे तर अनेकांनी जगण्याची उमेद गमावली आहे. त्यातून शहरात आणि घरोघरी असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. कौटुंबिक हिंसा, मुलांचे भावनिक प्रश्न, छोट्या छोट्या घरात एकत्र राहताना होणारी घालमेल, त्यामुळे अशा काळात मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्या लोकांचे समुपदेशन करून पुनर्वसन करण्याची गरज भासू शकते. अन्यथा मानसिक विकलांगांची नवी समस्या निर्माण होईल.

शाळा, कॉलेजचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. पण सर्वच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा आहे काय? ज्यांच्याकडे नाही अशा मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठ स्तरावर असलेली सेमिस्टर पद्धत तत्काळ बंद करून वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात यावा. हा निर्णय सर्वार्थाने योग्य ठरण्याची शक्यता आहे. निदान कला शाखेसाठी तरी हा निर्णय घ्या.

यापुढच्या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि व्यक्तिगत स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेला महत्त्व येणार आहे; पण अद्यापही आपण खेड्यापाड्यात पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडवू शकलेलो नाहीत. अशावेळी शहरातून आपल्या गावाकडे परतलेले हजारों लोकांमुळे आधीच बकाल असलेल्या खेड्याचे प्रश्न अधिक तीव्र होणार आहेत. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसताना त्यांना वारंवार हात धुवा हे आपण कसे सांगणार? शिवाय अवैध मार्गाने गावोगावी गुटखा विक्री सुरुआहेच. जी मानवी आरोग्यासाठी घातक आहे. कायद्याने बंदी असलेला गुटखा सर्वत्र उपलब्ध होतोच कसा? ही जबाबदारी कुणाची?

दुसरी गोष्ट म्हणजे आता पावसाळा तोंडावर आहे. कोरोनामय काळामुळे शेतकरी आधीच पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शेतातली पिकं शेतातच सोडून गेली आहेत. प्रचंड नुकसान झालेला शेतकरी मानसिकदृष्ट्या खचतो आहे. हा प्रश्न खूप गंभीर आहे. पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि शेत मजुरांना मोठा आधार देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या यंत्रणेलाही आता सज्जड दम भरायला हवा.

मा. मुख्यमंत्री महोदय,
असे हजार प्रश्न आहेत. या प्रश्नांची आपल्याला कल्पना नाही, असे कसे म्हणता येईल? महाराष्ट्रातील लोककलावंत वार्‍यावर आले आहेत. दलित भटक्या विमुक्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोककलावंत अस्वस्थ आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला ही सर्व क्षेत्रे पूर्ववत कशी करता येईल? याचा विचार करायला हवा. कारण लोककलावंतांकडे फार मोठे सांस्कृतिक धन असते. मात्र, त्यांना जगण्याची नवी संधीच मिळणार नसेल तर मात्र प्रश्न बिकट होत जातील. नाटक, चित्रपट, तमाशा, ऑर्केस्ट्रा आणि मनोरंजनाचे संपूर्ण क्षेत्र कोलमडले आहे. त्यामुळे फार मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय,
वृत्तपत्र व्यवसाय डळमळीत झाला आहे. प्रकाशन संस्था बंद पडण्याची शक्यता आहे. ग्रंथालयाची रया गेली आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे पूर्ववत सुरू होतीलही, पण पूर्ण क्षमतेने प्रवेश होतीलच याची कोणतीच खात्री देता येत नाही. पर्यटनाच्या क्षेत्रालाही सर्वात मोठी बाधा पोहोचणार आहे. खरेतर पर्यटन हा दोन संस्कृतीचा दुवा साधणारा एक महत्त्वाचा भाग असतो. पण यापुढच्या काळात या क्षेत्रावरही मोठे संकट कोसळणार आहे. अनेक तीर्थक्षेत्रे आणि प्रार्थनास्थळे ओस पडली आहेत. त्यावर उपजीविका करणाऱ्यांचेही वेगळे प्रश्न समोर येतील. लोकांचे बौद्धिक आरोग्य उन्नत करण्यासाठी विविध ज्ञान शाखांना, शिक्षण आणि संशोधन संस्थांना बळ द्यायला हवे. आपण आपल्या पातळीवर संशोधन करायला हवे.

ज्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे तेच यापुढच्या काळात नीट जगतील. पण इतरांचे काय?
यासाठी आपण एक नवी यंत्रणा उभी करायला हवी. समाजातल्या कोणकोणत्या क्षेत्राची काय हानी झाली आहे किंवा भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याचा एक मोठा सर्व्हे करण्याची गरज आहे. लोकांचे छोटे-मोठे प्रश्न समजून घ्यायला हवेत. प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करायला हवी. याकामी समाजातील विद्वानांची, अभ्यासकांची मदत घ्यायला हरकत नाही. केवळ फेसबुक लाईव्ह बोलून लोकांना दिलासा मिळणार नाही. सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पाठवायला हवे. त्यांना धीर द्यायला हवा. त्यांना जगण्याची खात्री द्यायला हवी. हे सर्व करत असताना भ्रष्टाचार होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. जे अधिकारी किंवा कर्मचारी अशा काळात अनैतिक वागतील त्यांना दंड करायला हवा. महागाईचे एक मोठे संकट समोर येऊ शकते. अशा काळात काळाबाजार करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवे.

मुख्यमंत्री महोदय,
तुम्ही हे सर्व करू शकता. तुमच्यात ती धमक आहे. तुम्ही जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तसेच राज्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या पक्षाचे प्रमुखही आहात. म्हणजे तुमच्याकडे प्रशासकीय यंत्रणा आहे. लाखो कार्यकर्ते सुद्धा आहेत. या सर्वांच्या मदतीने महाराष्ट्रातल्या जनतेला देदीप्यमान महाराष्ट्राचे एक समृद्ध स्वप्न दाखवायला हवे. केवळ स्वप्न दाखवू नका तर त्या दृष्टीने पावले टाका. लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. अन्यथा काळ कुणालाही माफ करत नाही! असो आपल्या कार्याला मनोमन शुभेच्छा !!!
धन्यवाद

आपला

-डॉ. पी. विठ्ठल, नांदेड
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)
इमेल: p_vitthal@rediffmail.com>
संपर्क: ९८५०२४१३३२

8 thoughts on “# मा. मुख्यमंत्री महोदयांना अनावृत्त पत्र…

  1. डॉ.पी.विठ्ठल
    आपण वास्तवदर्शी आणि परखड प्रश्न विचारले आहात. जे पुढील काळात खूप गरजेचे आहे.

    मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब या सर्व विषयावर नक्की विचार करतिल. 🙏

  2. सर, आजच्या परिस्थितीवर अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून टीपणी केली आहे. या भयावह स्थितीचा अंदाज कुणालाच नाही. आजाराच्या संसर्गाबड्डल ही सगळे जग अनाबिज्ञ आहेत. परिणाम तर भयंकर आहेत.
    सरकार मयबापला आपण आणखी जागृत करण्याचा एक प्रयत्न आपण केला. सर, आपले खूप कौतुक आहे.

  3. खरोखर विचार व्हायला हवा सखोल.

  4. खुपच ऋदयस्पर्शी आपण मांडणी आहे सर किमान आपण दिलेल्या या सर्व गोष्टीची दखल घेत 25% जरी यावर विचार मुख्यमंत्री महोदयांनी केला तर महाराष्ट्राचे बऱ्यापैकी पहिले होईल, आपण एवढा छान लेख लिहिला त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार, आभार यासाठी की आहे रे यांचा विचार तर सर्वजण जण करतात परंतु नाहिरे कडे बघण्यासाठी आपण ही मांडणी अतिशय मोजक्या शब्दात केली आणि ती खूप भावली.

  5. खूप वास्तववादी विचार आपण ठेवला आहे पण तो मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोचावा ही अपेक्षा आपले मनापासून आभार

  6. पत्रातील तळमळ मोलाची आहे, पण महाराष्ट्र कशाला ? भारताचे प्रधानमंत्री यांच्याकडे काय आराखडा आहे? हे ही सरांनी विचारायला हवे होते? पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले हे ठीक पण प्रधानमंत्री यांना जाब कधी विचारणार?

  7. महाराष्टाच्या पुढील भविष्याच्या दृष्टीने एक मार्गदर्शक असे हे पत्र आहे.या दृष्टीकोणातून या कडे बघितले तर पुढील काळ सुस्थितीत होण्यास नक्कीच फायदेशीर होईल !
    अभिनंदन सर ..!

  8. 100% बरोबर मांडणी केली आहे . एक एक प्रॅेरे ग्राफ मुद्दे सुदमांडला आहे . ह्या मोठया लोकांना सर्व साधारण माणसाच्या समस्या काय आहेत हे कसे किळनार कारण त्यांना कष्टकाय हे जन्मजात माहीत नाही . म्हणुन म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा कळे त्याला .

Leave a Reply to गणेश पवार Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *