# कोरोना काळातील अस्वस्थता: कामगारांची अन् मालकांचीही… -सुरेंद्र कुलकर्णी.

 

 

रोज एक फोन येतो, जो घेण्याआधी बराच वेळ फोनकडे पाहतच बसावे लागते…
मित्राच्या फोनवर तर तुटून पडण्याचा हा काळ….
कस्टमरचा कॉल तर शक्यच नाही….सप्लायरचा आला तर sms येतो …मग हा कॉल कुणाचा असतो, ज्याने एवढे गप्प बसायला लागते?

“हेलो, सरजी, क्या करें हम…और थोडा पैसा फोन पे करते हो तो हम राशन का इंंतजाम कर सकते है…तो जरा फोनवा से डाल दिजीए ना सरजी”इत्यादी इत्यादी..

मार्च 20 पर्यंतचे wedges तर दयायचे होतेच. मग ते 20 दिवस आधीच द्यायला चालू केले व दोन-तीन टप्प्यात दिले. टप्प्या-टप्यात एवढ्यासाठी की आता त्या कामगारांनी किमान गरजा भागवाव्यात व धीर सोडू नये.

तसेही एकदम पूर्ण दिल्यास भीती, ती अशी की,
ऑपरेटर गेले तर?
आणि पुन्हा आले नाही तर?
आणि ते तिकडे पोहोचले किंवा अर्ध्यापर्यंत पोहोचले आणि इकडे लॉकडाऊन काढून घेतला गेला तर?
ते जाताना कसे जाणार?
ते येताना कसे येणार?
त्यांना जाताना संसर्ग झाला तर?
त्यांना येताना संसर्ग झाला तर?
आणि इथे आल्यावर संसर्ग झाल्याचे 15 दिवसांनी कळले तर??

असे हे प्रश्न या 40/42 दिवसांत अनेक वेळेस आम्हा काम देणाऱ्यांना आणि आमची कामे करणाऱ्यांना त्यांचा फोन आल्यावर, त्यांच्याशी बोलत असताना व बोलणे झाल्यावर आलटून पालटून पडत असतात..!
अस्वस्थता किंवा anxiety काय असते तर ही!!!

जिथे देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्या संसर्ग झालेले रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यू पावणारे रुग्ण यांबाबत अनिश्चितता असेल, तर आपण कोण कुठले? आणि आपल्यावर अवलंबून असणारे कोण कुठले?
ते आपल्यावर आणि आम्ही त्यांच्यावर अवलंबून. म्हणून कोणतीही एक बाजू संभ्रमात पडली की लॉकडाऊन संपला तरी नवीन जुळवाजुळव आलीच! मग या आहे त्या लोकांना ट्रेनिंग देऊन एका पातळीवर आणून कामाचा वेग व उत्पादकता निश्चित केलेली असते, त्यानुसार कस्टमरला काही commit केलेले असते, तिचे काय? बरं, पाठीवर हात टाकून काही विश्वास द्यावा, धीर द्यावा इथेच थांबून ठेवावे तर एकत्र यायचीच पंचाईत! जे काय बोलायचे ते फोनवरच ! आधीच ही कामगार मुले एकत्र राहतात व प्रत्येकाला जे सुचते व फोनवरून वेगवेगळे कानावर पडते त्यानुसार ते चर्चा करतात व आपल्याला एकेक अडचण सांगत राहतात. इथे असताना आगाऊ पैसे देताना किंवा मदत करताना प्रश्न नसतो. पण या वेळेस आपण कितीही विश्वास दिला तरी ते बिघडत जाणाऱ्या परिस्थितीला घाबरून किंवा वैतागून एका रात्रीत बोरी बिस्तर एक करून थेट किंवा गावी गेल्यावरच “हम तो पहुंच गया, साहब” म्हटल्यावर आपण कुठं पहुँच जायचे?

ही परिस्थिती होती आमची गेले 40/45 दिवस! कारभार जितका मोठा तितकी ही अस्वस्थता काही गुणकांनी समप्रमाणात वाढणार हे ओघाने आलेच! त्यात घोषणा झाली की 3 मे पर्यंत लॉकडाऊन असणार…! वाटले, चला काहीतरी डेडलाईन ठरली ना! पण जगभरातून, देशभरातून,
राज्यातून, प्रांतातून व जिल्ह्याजिल्ह्यांतून रोज येणाऱ्या बातम्या एवढ्या थैमान घालत होत्या आणि आहेत की कामगार आणि आम्हाला वाटायचे कशावरून 3 मेला लॉकडाऊन उठणार! तसेच झाले 3मे वरून तो लॉकडाऊन पसरला 17 मे पर्यंत..! त्यात वापस जाण्याच्या ट्रेन्स, मेडिकल सर्टिफिकेट्स इत्यादीच्या बातम्या येऊ लागल्या व कामगार ते सर्टिफिकेट घेणे व तिकिटांची व्यवस्था करू लागले. मेट्रोचे काम सुरू होणार, होणार म्हणत होते, नाही. वाटले, कंपनीची नाही तरी, मेट्रो व इत्यादी सरकारी कामे तरी चालू होण्यास हरकत नव्हती. पण त्यांच्याकडून काहीच खात्रीदायक माहिती नाही. अनिश्चिततेच्या या वातावरणात आमच्या दृष्टीने आता यूपीच्या मुलांना थांबवणे हे हळू हळू आवाक्याच्या बाहेर जाऊ लागले.

त्यांच्या दृष्टीने काम नसताना इथे थांबणे आणि आमच्या दृष्टीने काम नसताना थांबवणे तसेच सुरू झाल्यावर किती दिवस चालू राहील, कोणत्या स्वरूपात चालू राहील याबाबत कल्पना नव्हती. ही परिस्थिती 6 मे पर्यंत होती. 5 मे रोजी 190 च्या आसपास मृत्यू झाले आहेत, ही बातमी सर्वांनाच प्रतिकूल वाटत असल्यामुळे शेवटी आम्ही जोपर्यंत संपूर्णपणे लॉकडाऊन जोपर्यंत रद्द होत नाही, तोवर काम सुरू न करणे असा निर्णय घेतला व इथे थांबणे किंवा गावी जाणे याचा निर्णय कामगारांवर सोपवला. तसेही इतर सोबती गावी जात असताना या परिस्थितीत इथे थांबण्याकडे कुणाचा कल नव्हता म्हणून ते मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्याच्या मागे लागले होते जेणेकरून तिकीट मिळाले की ते जाणार हे निश्चित आहेच. थांबवल्यावर त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे हे आपसूकच आले, जे कुठल्याही कंपनीच्या प्रोप्रायटरला त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याशिवाय व दिवसाचे 24 तास त्या जागेतून बाहेर न पडण्याची हमी घेतल्याशिवाय शक्य होत नाही. म्हणजे आपणही तिथेच राहणे हे आले!

हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन हेच की जेव्हा विपरीत परिस्थिती येते तेव्हा निर्णयांच्या फटकाऱ्याबरोबर परिस्थतीत पीळ पडत जातो. एक छोटा कारखानदार या नात्याने ही परिस्थिती समोर आणणे, यातून भलेही काही साधणार नसेल तरीही आपली भूमिका व त्या अनुषंगाने येणारी जबाबदारी याचे लघुत्तम सामाईक स्वरूप व्यक्त करणे व वाट पहात बसायचे… कधी संसर्ग थांबण्याची, कुठे मृत्युदर कमी झाल्याचे, कुठला रेड ऑरेंज झाल्याची, कुठे ऑरेंज ग्रीन झाल्याची अन् कुठून तरी anti vaccine तयार झाल्याची तर कुठून ‘ते’ तयार होऊन चाचणी यशस्वी झाल्याच्या बातमीची…आणि पर्यायाने लॉकडाऊन उठून काम सुरू होण्याची वाट पहायची….तोवर वेळ काढायचा, आपला कामगारांचा!!!

म्हणून म्हटले
रोज एक फोन येतो, जो घेण्याआधी बराच वेळ फोनकडे पाहतच बसावे लागते…

-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 976720226
surendrakul@rediffmail.com

3 thoughts on “# कोरोना काळातील अस्वस्थता: कामगारांची अन् मालकांचीही… -सुरेंद्र कुलकर्णी.

  1. सद्य स्थितीत छोट्या कारखानदार म्हणून आपण व्यक्त केलेले मनोगत सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आणते. कारखानदार छोटा असो की मोठा कोरोनामुळे उद्योग ठप्प झाल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जेवढा उद्योग मोठा तेवढा तोटा अधिक असणार आहे. शासनाने काही उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी आता बरेच कामगार गावी गेलेली असल्याने अडचणीत भरच पडणार आहे. सर्वत्र एक अनिश्चितता पसरली असून येण-या काळात उद्योग, त्याचे स्वरूप व आर्थिक गणिते याचा अंदाज करणे खरंच कठीण आहे. प्राप्त परिस्थितीत यापुढे कोरोनासोबत जगण्याची प्रत्येकाला सवय करून घ्यायलाच हवी हे सत्य नाकारता येणार नाही.

Leave a Reply to Editor Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *