पुणे: मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने बडोदे शहरात श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांच्या प्रेरणेने १९३१ मध्ये स्थापन झालेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे ७२वे अधिवेशन वार्षिक अधिवेशन १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान प्रोफेसर माणिकराव आखाडा, जुम्मादादा व्यायाम मंदिर येथे सुप्रसिद्ध कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे, अशी माहिती परिषदेचे कार्यवाह संजय बच्छाव यांनी दिली.
शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. श्रीराम काशिनाथ दामले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून गुजरात विधानसभेचे दंडक बाळकृष्ण शुक्ल, तसेच बडोद्याच्या उपमहापौर नंदाताई जोशी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत अभिनेते विघ्नेश जोशी घेणार आहेत.
शनिवारी सकाळी दहा वाजता कवी सौमित्र यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. त्यात अंजली मराठे, रेवती दाभोळकर, डॉक्टर सुरेखा विनोद, प्रसाद देशपांडे, अनिल राव, चंद्रकांत धाडणकर, वैशाली भागवत, सायली कुलकर्णी, अंजली माणगावकर, अजित पाटणकर व सुनील जोशी सहभागी होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता रत्नागिरी येथील प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांचे ‘मराठीच्या बोलींचा गोडवा’ या विषयावर व्याख्यान होईल.
रविवार, १२ रोजी सकाळी दहा वाजता ‘सामाजिक माध्यमांचा वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम’ या विषयावर परिसंवाद होणार, असून त्यात ॲड अवधूत सुमंत, प्रा. चिरायू पंडित, जयश्री पराग जोशी व मुग्धा केळकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता संमेलनाचा समारोप होईल. त्यानंतर ‘सूर मानस’ प्रस्तुत ‘भावगंध’ हा स्थानिक कलावंतांचा मराठी भावगीतांचा कार्यक्रम सादर होईल. त्यात सुधा अफीणवाले, धनश्री पाध्ये, गौरी फाटक, श्रेयसी मंत्रवादी, मानसी बापट, सुधीर शेज्वलकर आणि जयराज जोशी हे गायक कलाकार सहभागी होतील. संगीत संयोजन दीप वझे करणार असून, नंदन भोळे (तबला), वर्षा गोळवलकर (संवादिनी) आणि धवल रावल (ढोल व ऑक्टोपॅड) यांची साथ मिळणार आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मिलिंद बोडस, कार्यवाह संजय बच्छाव व प्रकाश गर्गे, खजिनदार शशांक केमकर व कार्यकारी मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.