# शेतकऱ्यांना मिळणार बांधावर खते, बियाणे.

पुणे:  शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथके तसेच 38 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची नेमणूक केली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निबंर्धामुळे खरीप हंगामासाठीच्या निविष्ठा पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  ज्ञानेश्वर बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

दरम्यान, क्षेत्रिय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषीसहाय्यक यांनी आत्मा योजनेचे गावातील कृषी मित्र तसेच गावामध्ये कार्यरत असलेल्या शेतकरी गट प्रमुख व शेतकरी उत्पादक कंपनी यांची मदत घेउन शेतक-यांना त्यांचे बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

2 लाख 19 हजार 700  हेक्टर  क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
पुणे जिल्हयात खरीप हंगाम 2021 मध्ये एकूण 2 लाख 19 हजार 700  हेक्टर  क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भात  61 हजार हेक्टर, बाजरी- 54 हजार हेक्टर, सोयाबीन-28 हजार 500 हेक्टर, मका-  25 हजार हेक्टर व मूग 15 हजार हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

28 हजार 086 क्विंटल बियाणांची मागणी
जिल्ह्यामध्ये बियाणांची मागील तीन खरीप हंगामांची सरासरी विक्री 22 हजार 497 क्विंटल असून 2121-22 च्या खरीप हंगामासाठी 28 हजार 086 क्विंटल बियाणांची मागणी आहे. पैकी दिनांक 20 मे  2021 अखेर महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांचे मार्फत  6 हजार 871  क्विंटल खाजगी कंपनीमार्फत 6 हजार 713  क्विंटल असा एकूण 13 हजार 584  क्विंटल (48 टक्के) पुरवठा झाला आहे.   यामध्ये मुख्यत्वे भात 11 हजार 108 क्विंटल सोयाबील 1हजार 274 क्विंटल व बाजरी- 400 क्विटल या प्रमाणे पुरवठा झाला आहे.

मागील खरीप हंगामामध्ये एकूण 1 लाख 95 हजार 346 मे. टन खताचा पुरवठा झाला आहे. मागील रब्बी हंगामातील सुमारे  89 हजार 763 मे. टन खत शिल्लक असुन येणा-या खरीप  2021  साठी 1 लाख 84 हजार 480 मे. टन इतके आवंटन मंजूर झाले आहे. मागील रब्बी हंगामाचे शिल्लक खताचा साठयासह आजअखेर 1 लाख 21 हजार 963  मे. टन (66 टक्के) खताची उपलब्धता झाली आहे. येत्या खरीप हंगामामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बांधावर खत व बियाणे वाटपाबाबत जिल्हा कृषी विभागामार्फत एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामध्ये शेतकरी, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांना आवश्यक असलेले बियाणे (पिक व वाणनिहाय व खते (ग्रेडनिहाय) मागणी करता येणार आहेत. त्याव्दारे क्षेत्रिय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषीसहाय्यक यांनी आत्मा योजनेचे गावातील कृषी मित्र तसेच गावामध्ये कार्यरत असलेल्या शेतकरी गट प्रमुख व शेतकरी उत्पादक कंपनी यांची मदत घेउन शेतक-यांना त्यांचे बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

भरारी पथकाची खरिप व्यवस्थेवर नजर
जिल्हयात बियाणे, खते व किटकनाशके यांचे अनुक्रमे 2 हजार 135 ,  2 हजार 409 व 2 हजार 197  असे एकूण  6 हजार 733 विक्रेते आहेत. पुणे जिल्हयामध्ये एकूण  38  गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत असून निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी तालुकास्तरावर  13 , जिल्हास्तरावर 1 अशा एकूण  14  भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

सनियंत्रण कक्षातून निविष्ठा पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण
कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली असामान्य परीस्थिती व शासनाने लागू केलेल्या निबंधामुळे येणा-या खरीप हंगामामध्ये निविष्ठा पुरवठ्यामध्ये येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दुरध्वनी क्रमांक  25537798 / 25538310 असा असून इमेलआयडी dsaopune@gmail.com adozppune@gmail.com तरी सदर ठिकाणी आपणाला येणाऱ्या अडचणी नोंदवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *