पुणे: कोरोनाच्या लढाईत प्लाझ्मा थेरपी अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्लाझ्मा थेरपीबद्दल जनजागृती निर्माण व्हावी. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय आहे. याविषयीची माहिती व्हावी. याकरीता टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे, समाज प्रबोधनात्मक स्पेशल कव्हर (विशेष पाकिट) तयार केले आहे. या पाकिटाचे प्रकाशन १५ ऑगस्ट रोजी पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस.एफ.एच.रिझवी यांच्या हस्ते होणार आहे.
कोरोनाच्या लढाईत कोरोना वॉरिअर्स प्रमाणे टपाल विभागाचे कार्यही मार्च महिन्यापासून सुरू आहे. टपाल कर्मचार्यांनीही लॉकडाऊनच्या काळात नागरिकांसाठी सेवा दिली आहे. या कोरोना वॉरिअर्सला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांमध्येही प्लाझ्मा थेरपी विषयी जागृती वाढावी. याकरीता, प्लाझ्मा डोनर, सुपर वॉरिअर हे स्पेशल कव्हर तयार करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता पुणे स्टेशन येथील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयात या स्पेशल कव्हरचे प्रकाशन होईल. एखादी महत्वाची घटना किंवा प्रसंगावर भारतीय टपाल खात्यातर्फे स्पेशल कव्हर तयार करण्यात येते. त्यानुसार पुणे विभागाने यंदा प्लाझ्मा थेरपीसंबंधी माहितीचे स्पेशल कव्हर तयार केले आहे. असे सहायक पोस्ट मास्तर जनरल आर.एस. गायकवाड यांनी सांगितले.