चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून साकारला महामानवाचा जीवनपट

छत्रपती संभाजीनगर: एक एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत
प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने
‘सामाजिक न्याय पर्व’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 13 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर विभागातील शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग नोंदवला..

या कार्यक्रमाचे उद्घाटक आप्पासाहेब काटे, प्रख्यात चित्रकार, प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. आरती जोशी व छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे  ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सोनकवडे यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात असे सांगितले की,  कलेमुळे व्यक्तिमत्व विकास होतो. आत्मविश्वास, स्वाभिमान जागा होण्यास मदत होते. तसेच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. महापुरुषांच्या आणि विविध सामाजिक प्रश्नांवरती रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटल्याने विद्यार्थ्यांचे वैचारिक आणि मानसिक प्रबोधन करता येते असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक आप्पासाहेब काटे प्रख्यात चित्रकार यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्व पटवून सांगितले व जगातील सात कलेपैकी चित्रकला हे एक कला असल्याचे सांगितले. खऱ्या अर्थाने सौंदर्याची अभिव्यक्ती कलेतून निर्माण व्हावी असा आशावाद व्यक्त केला. जुन्या काळी कलेला खूप महत्व होते आता ते व्यावसायिक होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. आरती जोशी म्हणाल्या की,  कला ही मनाला ऊर्जा देत असते, मन उत्साही होवून जीवनात सकारात्मक विचार येतात. कलेमुळे पवित्र मन तयार होत असते कला विधायक गोष्टीकडे घेऊन जाते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक न्याय भवन विभागातील विद्यार्थ्यांनी देशपातळीवर आपला नावलौकीक करावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या चित्रकला स्पर्धेमध्ये 150 व रांगोळी स्पर्धेमध्ये 140 शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास अस्मिता जावळे, वैशाली कळासरे, निर्मला बारसे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश भामरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सूर्यकला गोसावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *