# वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार.

 

मुंबई:  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक  ४५ दिवस आधी जाहीर करण्यासह दरवर्षीप्रमाणे दोन पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  मान्यतेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान, वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर  परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्त्वे व सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परीक्षा न घेण्याच्या मुद्यावर काहीसा प्रतिकूल प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता सुरक्षेच्या सर्व बाबी विचारात घेऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन त्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर त्यांना परीक्षा देता येईल. विद्यार्थी-पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. याउपरही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षा याबाबत ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाच्या या नव्या मार्गदर्शक  सूचनांनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

One thought on “# वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार.

Leave a Reply to Kranti Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *