मुंबई: राज्यातील स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या प्राध्यापक भरती आणि अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
या संदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करीत आहे. सन २००१ पूर्वी स्थापना झालेल्या ८९ शिक्षणशास्त्र (बी.एड.) महाविद्यालय,२००१ च्या पूर्वीची सर्वसाधारण कला वाणिज्य आणि विज्ञानाची ७८ महाविद्यालय, आदिवासी भागातील महाविद्यालय, नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालय, अल्पसंख्याक महाविद्यालय, डोंगरी भागातील विद्यालय, अशा सात ते आठ वर्गवारीतून अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा विषय पूर्ण करीत आहोत. या सर्व कामासाठी 900 कोटी रूपयांचा वित्तीय भार पडत आहे. या सर्व प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.