नांदेड येथील छायाचित्रकार विजय होकर्णे हे आज 31 डिसेंबर रोजी शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या आठवणी व कर्तृत्वाला उजाळा देणारा सुरेश वांदिले यांचा लेख…
मुंबई: छायाचित्रे, आपणास आयुष्याचा अर्थ समजावून देतात. मूर्तीकार मूर्ती घडवतो तर छायाचित्रकार त्या मूर्तीचं रहस्य आपणासमोर उघड करतो. प्रकाश आणि वेळेचं अचुक समन्वय जिथे साधलं जातं, ते म्हणजे छायाचित्र. फक्त छायाचित्रेच मानवी जीवनास अनेक संस्मरणीय क्षणांमध्ये विभाजित करु शकतात. ते प्रत्येक क्षण आपल्या अस्तित्वाला परिपूर्णता देत असते. छायाचित्रकार फक्त चित्र काढत नसतात, तर प्रतिमा निर्मिती करत असतात.असं बहुविध रितीनं छायाचित्रकार आणि छायात्रिकारांबाबत कौतुकानं आणि आदरानं लिहिलं- बोललं जातं. छायाचित्रकार हा कविइतकाच श्रेष्ठ असतो. कारण, जे न देखे रवी ते देखे कवी, असं सार्थपणे सांगितलं जातं. तसच छायाचित्रकारा संदर्भातही म्हणायला हवं. कारण इतरांना जे दिसत नाही, इतरांच्या नजरेसमोर येत नाही, ते त्याला दिसतं आणि तो कलात्मकरित्या आपल्यासमोर बारकाव्यांसह सादर करतो. अनेक छायाचित्रे हे एखाद्या प्रतिभावंत लेखकाच्या ललितबंधासारखे असतात. तरल, सूक्ष्म आणि सृजनाच्या विविधांगी छटा अलगद उलगडवून दाखवणारे!
१००० शब्द जे सांगू शकत नाही किंवा व्यक्त करु शकत नाही ते एक छायाचित्र करु शकतं, असं पत्रकारितेच्या विश्वातील सर्वमान्य सत्य आहे. या सर्व व्याख्या किंवा चिंतन किंवा आकृतीबंधात सर्वार्थाने बसण्याचा सन्मान विजय होकर्णे या मनस्वी छायाचित्रकारानं प्राप्त केला आहे. हा सन्मान श्री. होकर्णे यांना त्यांच्या अथक परीश्रमाने, सदैव गतिशील राहिल्याने आणि स्वत:ला कधीही, आऊट ऑफ फोकस होऊ न देण्याचा कलेने आणि काळानुरुप स्वत:ला नियतिमपणे अपडेट करत राहिल्याने मिळाला आहे. श्री होकर्णे आता ५८ वर्षांचे झाले आहेत. रुढार्थाने ते आता ज्येष्ठांच्या श्रेणीत बसतात. पण त्यांच्यासाठी वय ही अगदीच शुल्लक बाब! वयाने सर्वांनाच ज्येष्ठत्व प्राप्त होते. पण हे ज्येष्ठत्व तसे बिनकामाचे! मात्र श्री. होकर्णे सारख्या व्यक्तिंना ज्येष्ठत्व प्राप्त होते ते त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यांच्या अफाट कार्यामुळे. श्री. होकर्णे यांनी असे अफाट कार्य तिशी चाळीशीतच करुन ठेवले. त्याअर्थाने ते केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टातील ज्येष्ठ छायाचित्रकार ठरतात. त्यांचा पुढचा प्रवास हा ज्येष्ठतेकडून श्रेष्ठत्वाकडे झाला आहे. नांदेड वासियांसाठी ते, घराचच विजू असल्याने त्यांचे हे श्रेष्ठत्वं अनेकांच्या लक्षातही आलं नसावं. किंबहुना ते श्रेष्ठत्वाच्या श्रेणीत बसू शकतात, अशी कल्पनाही ते करु शकत नाहीत. पण नांदेडच्या बाहेर महाराष्ट्रातील इतर ठिकाणांहून श्री. होकर्णे यांच्या कर्तृत्वाकडे बघताना त्याच्या श्रेष्ठत्वाकडे वस्तुनिष्ठपणे बघता येते. श्री. होकर्णे हे शासकीय छायाचित्रकार होतं. शासकीय छायाचित्रे एका पठडीतली आणि कंटाळवाणी असतात असा एक निरर्थक समज करुन घेण्यात आला आहे. मात्र, या निरर्थकतेला खोडून काढणारे हजाराने पुरावे श्री. होकर्णे यांच्या छायाचित्रातून मिळतात. कोणत्याही पठडीतल्या व्यासपीठास जिवंत करण्याचं कौशल्य त्यांच्या छायाचित्रण कौशल्यात आहे. हे असे व्यासपीठ स्थिर स्वरुपात बसून असल्याचा कोणताही भास त्यांच्या छायाचित्रात दिसत नाही.
नांदेडच्या शासकीय विकास कामांचा गेल्या ३० -३५ वर्षातील इतिहास हा श्री होकर्णे यांच्या छायाचित्रांनी जिवंत करुन ठेवला आहे.या काळातील लिखित साधने आज उपलब्धही होणार नाहीत पण या काळातील प्रत्येक महत्वाच्या घटनेचे छायाचित्र श्री होकर्णे यांच्याकडे हमखास मिळते.त्यांचे कौशल्य इतके मोठे की ते कालसुसंगतरीत्या अल्पावधीत उपलब्धही करुन देऊ शकतात.गेल्या ३० वर्षात नांदेड कसं बदलत गेलं याचं मूर्तरुप श्री होकर्णे यांच्या छायाचित्रांमुळे प्रभावीरीत्या आपल्या समोर येतं. विकास हा जसा एक भाग झाला त्याचबरोबर विध्वसांचे विविध क्षण श्री होकर्णे यांनी बरेचदा जीवावर उदार होऊन टिपले आहेत.त्यात महापूर,दंगली,दुष्काळ,पाणी टंचाई, भूकंप, अपघात, मृत्यू अशा कितीतरी बाबी आहेत.
शासकीय कार्यक्रमांच्या छायाचित्रांमध्ये बातमी दिसायला हवी, यासाठी री होकर्णे यांची कायम धडपड असायची. अनेकदा असं म्हंटल जातं की दोन ओळींमध्ये दडलेला अदृष्य आशय लक्षात यायला हवा. हे असं दोन ओळींमध्ये आशय दडवणं लिखित शब्दकार म्हणजे पत्रकार आणि किंवा ज्योतिषांनाच शक्य आहे.थेट-स्पष्ट असं सांगण्यासाठी आपली भाषा सक्षम आणि समर्थ असताना असं दोन ओळींच्या मधला आशय समजूनघेण्याची तसदी सर्वसामान्यांनी कां बरं घ्यायची? छायाचित्रकार कधीच त्या भानगडीत आणि आढ्यतखोरित पडत नाहीत.ते जे काही दाखवतात ते थेट स्पष्ट, स्वच्छ आणि वस्तुनिष्ठ असते.श्री होकर्णे यांचा यात हातखंडा आहे.शासकीय छायाचित्रकारास अतिशय गतिने आणि अनेक बाबींचे भान लक्षात ठेऊन छायाचित्र काढावं लागतं.अशा छायाचित्रात येणाऱ्या प्रत्येकासच आपण कुणीतरी वेगळे आहोत,अशा पध्दतीने चित्रीत करणे हे एखाद्या निष्णात शल्क चिकित्सकासारखे कौशल्याचं काम.ते फार कमी छायाचित्रकारांना जमतं.श्री होकर्णे हे राज्यातील अशा छायाचित्रकांरामध्ये पहिल्या पहिल्या तीनमध्ये येतात असं म्हंटल्यास वावगं ठरु नये. त्यांनी रुढार्थाने पत्रकारीतेचं किंवा वृतपत्रीय छायाचित्रण कलेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण, पत्रकाराकडे ज्याप्रमाणे बातमी हुंगणारे तीक्ष्ण नाक हवे असते तसेच बातमी शोधणारी सूक्ष्म-तीक्ष्ण आणि चाणाक्ष दृष्टी श्री होकर्णे यांच्याकडे आहे.ही दृष्टीच त्यांच्या प्रत्येक छायाचित्राला बातमीचे मूल्य मिळवून देत असते,आणि बातमीचे मूल्य वाढवित असते.त्यांच्या छायाचित्राशिवाय कोणतीही बातमी अपूर्णच नव्हे तर प्राणविहीन झालेली असते.छायाचित्रण कलेचा असा कौशल्यानं वापर करुन श्री होकर्णे यांनी स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं.
शासकीय छायाचित्रण हा त्यांच्या कामकाजाचा भाग असला तरी त्यांनी त्यांच्यातील संवदेनशील कलावंतास कायम सजग ठेवलं. त्यामुळे शासकीय कार्यक्रमांशिवाय श्री. होकर्णे यांनी पशू-पक्षी-निसर्ग-अरण्य-गड-पर्वत-किल्ले-मंदिराचे स्थापत्य-शिल्प-नद्या-अवघड वळणे-दुर्मिळ मूर्ती-धबधबे-शेती- व्यक्ती यांची काढलेली हजारो छायाचित्रे ही त्यांची छायाचित्रण कला उच्चश्रेणीची आणि कालातीत असल्याचं सिध्द करते. या छायाचित्रांनी संबंधितांना अमरत्व दिलं आहे.
माझ्या सुदैवाने माहिती व जनसंपर्क महासंचालयानतील पहिली पदस्थापना (पोस्टिंग) ही नांदेड येथे जिल्हामाहिती अधिकारी म्हणून झाली. सुदैव यासाठी की महाराष्ट्रातील केवळ चार- पाच जिल्ह्यांमध्ये तेव्हा छायाचित्रकाराचं अधिकृत पद होतं. त्यामुळे माझ्या शासकीय नोकरीची सुरुवातच ही विजय होकर्णे यांचं बोट धरुन झाली. श्री होकर्णे आणि नांदेडचा चालता बोलता विश्वकोश असलेले वाहनचालक शहाणे काका यांनी मला शासकीय पत्रकारीतेची दिशा आणि दृष्टी दिली. जवळपास तीन वर्षे आम्ही नांदेड जिल्हा वेड्यासारखा पिंजून काढला. सोप्या ठिकाणांपासून तर अत्यंत अवघड ठिकाणांपर्यंत जाण्यासाठी श्री. होकर्णे कायम तयार असत. माहूर गडानजिक असलेल्या व जिथे फारसं कुणी जात नाही अशा दुर्गम पांडवलेण्यात आम्ही जाऊन आलो. काही रहस्यमय दंतकथांमध्ये अडकलेल्या माहूरच्या किल्ल्यातील अंतर्गत भागाची मुशाफिरी केली. कंधारच्या किल्ल्याची भव्यता श्री. होकर्णे यांच्यामुळेच कळू शकली. अर्धापूरजवळच्या तेव्हा जवळपास अडगळीत आणि अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या केशवराजांच्या मूर्तीजवळ आम्ही पोहचलो. माळेगावच्या यात्रेचा रंगीन माहोल श्री. होकर्णे यांच्यामुळे जिवंत करता आला. कित्येक नव्या नव्या ठिकाणी भेटी देऊन दुर्मिळ मूर्त्यांचा नव्याने शोध घेता आला. संपन्नता आणि विपन्नता या दोन्ही घटकांचं अत्यंत जवळून चित्रण करता आलं. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुधीर कुमार गोयल यांच्या नेतृत्वाखाली ६ ते ६० वर्षे वयोगटासाठी जिल्हा प्रशासनाने साक्षरता अभियानाचं झपाटल्यागत काम केलं. या कामाला दृष्यरुपात आणण्यासाठी श्री. होकर्णे यांनी बजावलेली भूमिका अविस्मरणीय ठरली. बाबरी मस्जीद पाडल्यानंतर नांदेडमध्ये त्याचे पडसाद उमटले. गोळीबार झाल्याचेही स्मरते. तीनचार दिवस संपूर्ण संचारबंदी होती. तेव्हाच्या त्या अत्यंत स्फोटक परिस्थितीत नांदेडच्या अतिसंवदेशनशील भागात घडलेल्या घटना-घडामोडींच्या चित्रणासाठी एका पायावर तयार असलेले श्री. होकर्णे अजूनही स्मरणात आहेत. हे सर्व विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे, शासकीय चौकटीला भेदून त्यापलिकडे काम करण्यासाठी श्री.होकर्णे यांच्याकडे असलेली मानसिकता, उर्जा, उत्साह, पाठिंबा आणि स्वत:ला सतत सिध्द करण्यासाठीची तयारी या बाबी लक्षात याव्यात.
एखाद्या शहराच्या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांमध्ये त्या शहरातील किंवा गावातील राजकीय नेते, एखादा क्रीडापटू,चार-दोन मालिका, नाटक, सिनेमात काम केलेले नट-नटी, एखाद दुसरा लेखक-कवी-पत्रकार/संपादक यांचा समावेश केला जातो. पण एखाद्या छायाचित्रकाराचा समावेश अभावानेच होतो.
नांदेडच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक-साहित्यिक-सांस्कृतिक-औद्योगिक इतिहासाला समृध्द करण्यासाठी अनेक थोरामोठ्यांचा हातभार लागला. त्या मान्यवरांची या नात्या स्वरुपात प्रसंगपरत्वे आठवण केली जाते. स्मृती जागवल्या जातात. याच थोरामोठ्यांच्या पंक्तित विजय होकर्णे यांची छायाचित्रण कला बसते. श्री. होकर्णे ह नांदेडचे हिरा आहेत. ते आपल्यातल्याच म्हणजे घरातलाच असल्याने त्यांचं फार कौतुक आपणास फार वाटत नाही, किंवा इतर अनेकांमधला हाही एक, उसमे क्या? असंही बऱ्याच जणांना वाटू शकतं. पण आता विजय होकर्णेहे आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना, त्यांच्याबध्दलचं असं वाटणं नांदेडकरांनी सोडलं पाहिजे. गेल्या ३०-३५-४० वर्षात श्री.होकर्णे यांनी छायाचित्रणाच्या रुपात नांदेडला कायमस्वरुपी चैतन्यशील, जिवंत आणि प्रवाही करुन ठेवले. ते अद्वितीय कार्य आहे. हळव्या आणि संवदेनशील मनाच्या होकर्णे यांनी आपल्या कलेने नांदेडचा एक कालखंड अजरामर करुन ठेवला आहे. आता जबाबदारी नांदेडवासियांची आहे. या गुणी आणि चौफेर व्यक्तिमत्वाच्या कलंदर कलावंताची जपणूक करण्यासाठी त्यांनी समोर आलं पाहिजे. त्यांच्या नावाचं कला दालन किंवा छायात्रिण दालन उभारण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. हे कलादालन/छायाचित्रदालन हे केवळ त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन ठरणारे नाही तर ते कालाचा एक पट उलगडणारे इतिहासाचे दस्ताऐवज ठरेल. छायाचित्रण कलेचे सूक्ष्म बाराकावे अधोरेखित करणारी कलाकृती ठरेल. हाच श्री. होकर्णे याचा खरा-सन्मान आणि सत्कार ठरेल. त्याचं कौतुक फक्त एका जाहीर कार्यक्रमापुरतं आणि त्या कार्यक्रमातील कौतुकाच्या भाषणापुरतं मर्यादित ठेवणं योग्य नाही. कौतुकाचे शब्द लगेच विरुन जातात, हे लक्षात ठेवलेलं बरं! विजय होकर्णे या कलंदर कलावंतास मन:पूर्वक शुभेच्छा!
-सुरेश वांदिले
निवृत्त संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.