फडणवीसांच्या सांगण्यावरूनच विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा गौप्यस्फोट
मुक्ताईनगर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला.
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करत असताना खडसे यांचा गळा भरून आला.’माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगितले होते.असा धक्कादायक खुलासाही खडसेंनी यावेळी केला.