संस्थाचालक, संचालकांनी संस्थेकडे मालक म्हणून न पाहता विश्वस्त म्हणून काम करावे: राजकिशोर मोदी

अंबाजोगाई: सध्या राज्यात सतत कुठली न कुठली बॅंक, पतसंस्था तथा मल्टिस्टेट बुडित निघाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. अशा संस्थांच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांनी पोटाला चिमटा काढून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अतिशय विश्वासाने आपली जमापुंजी ठेवीच्या रूपाने ठेवलेली असते. या ठेवीचे रक्षण करणे हे त्या संस्थेच्या सर्व संचालकांची जबाबदारी असते.  ग्राहकांच्या विश्वासाला तडा जावू न देण्याचे काम संस्था चालकाचे असते. मात्र, सध्या दिवसेंदिवस कोणती न कोणती संस्था डबघाईला येऊन बुडीत निघालेली आढळून येत आहे त्यामुळे राज्यातील आर्थिक सहकार चळवळी वरील नागरिकांचा विश्वास कमी होताना दिसून येत आहे. तेव्हा आर्थिक सहकार चळवळ गतिमान व प्रगती पथावर ठेवण्यासाठी संस्थाचालक  व त्यांच्या सर्व  संचालकांनी सतत जागृत रहावे. तसेच संस्थाचालक व संचालकांनी मालक म्हणून काम न करता आपण संस्थेचे विश्वस्त आहोत अशीच भूमिका घ्यावी. मालक म्हणून जर आपले वर्तन राहिले तर संस्था अडचणीत येण्यास वेळ लागणार नसल्याचेही स्पष्ट मत अंबाजोगाई पिपल्स को. ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे.

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धा ही सर्वच क्षेत्रात वेगाने  सुरू झाली आहे. अश्या मध्ये बँकिंग क्षेत्र हे अपवाद कसे ठरणार.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाजगी संस्था जास्तीचे व मनमानी व्याजदर देण्याचे आमिष ग्राहकांना देत आहेत. या आमिषाला ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. जास्तीच्या व्याज दराच्या अमिषाला बळी जाऊन ग्राहक आपली जमापुंजी या संस्थामध्ये जमा करत आहेत. मात्र, या ठेवी परत करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र संस्था आर्थिक विवंचनेत सापडलेल्या दिसून येतात. ग्राहकांना आपल्या ठेवी वेळेवर परत मिळत नाहीत. अशा वेळेला मात्र ग्राहकांचा हिरमोड झाल्याचे लक्षात येते व ग्राहक हा उत्तेजित होऊन संस्था व त्यांच्या संचालकांना कोसतांना आढळतो. यावेळी आपण ज्यादा व्याजदराच्या प्रलोभणाला बळी पडल्याचे त्यांच्या लक्षात येते. मात्र त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. तेव्हा ग्राहकांनी आपली जमापुंजी कोणत्याही संस्थेत ठेवतांना त्या संस्थेची खातरजमा करून व ज्यादा व्याजदराला बळी न पडण्याचे आवाहन देखील अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी केले आहे.    

कोणत्याही संस्थाचालकांनी ग्राहकांना कर्ज देताना  विचार करून कर्जपुरवठा करावा. दिलेले कर्ज योग्य व्यक्तीकडे जात आहे याची खातरजमा करावी. तसेच आपण दिलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित पणे होत आहे याकडे देखील लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी संस्थेच्या सर्व संचालक मंडळांसह संस्थेच्या कर्मचारी यांनी कसोशीने प्रयत्न करावा. कारण वसुली हा कुठल्याही आर्थिक संस्थेचा कणा असतो. तो कणा मजबूत असेल तर ती संस्था देखील मजबूत स्थितीमध्ये असते. ग्राहकांना कर्जपुरवठा करतांना संस्थेने आपल्या ठेवीच्या ६० ते ७०% एवढाच कर्जपुरवठा करावा. दिलेल्या कर्जाचा वेळेवर परतावा आला तरच पुढील ग्राहकांसाठी अर्थसहाय्य करणे संस्थेस सोईस्कर होणार असते. आणि त्यामुळेच संस्था देखील अतिशय उत्तम प्रकारे चालू शकते अशी भावना राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *