यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर राज्य चालले तर महाराष्ट्रा सारखे दुसरे राज्य देशात नाही: ऋषिकेश कांबळे

अंबाजोगाईत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे शानदार उद्घाटन

अंबाजोगाईः मराठवाड्याच्या शिक्षणाचा खरा केंद्रबिंदू स्व. यशवंतराव चव्हाण असून स्व. यशवंतराव चव्हाण यांना समजून घेऊन त्यांच्या विचारावर महाराष्ट्र चालला तर महाराष्ट्रा सारखे दुसरे राज्य या देशात नाही असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक व तत्वज्ञ डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी काढले.

स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित केल्या जाणार्‍या 39 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, तत्वज्ञ व उदगीर येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी डॉ कांबळे हे बोलत होते. या प्रसंगी समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, कोषाध्यक्ष सतीश नाना लोमटे, प्रा. डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य बी. बी. ठोंबरे, भगवानराव बप्पा शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, प्रा. डॉ. कराड, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. ऋषिकेश कांबळे पुढे म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुसंकृत पणाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नाची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे. त्यांनी जी स्वप्न पेरली या स्वप्नांच्या पूर्तीचा वसा देशाने घेतला होता. लोकमान्य टिळकांचा प्रभाव यशवंतराव चव्हाण यांच्यावर होता. 1927 सालच्या निवडणुकीत ब्राह्मनोत्तर चळवळीचे उमेदवार भास्कर जाधव यांचा त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी प्रचार केला. यशवंतराव चव्हाण यांच्यावर चार वर्तमानपत्राचा प्रभाव होता, त्यांना वाचनाचा मोठा व्यासंग होता.

यशवंतराव चव्हाण यांनी 1930 साली जाणीवपूर्वक महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचे नेतृत्व स्वीकारले. त्याकाळी त्यांनी भूमिगत काम केले. ब्रिटिशांच्या विरोधातील महात्मा गांधी यांचे उपोषण सोडवण्यासाठी ते एस. एम. जोशी यांना घेऊन गेले. त्यांच्यावर आईचे संस्कार होते. कराड मधील अस्पृश्यांच्या मुलांना शिकता यावे यासाठी यशवंतराव त्यांच्या वस्त्यामध्ये जाऊन शिकवत असत. यशवंतराव समजून घेऊन त्यांच्या विचारावर महाराष्ट्रा चालला तर महाराष्ट्रा सारखे दुसरे राज्य या देशात  नाही.

विश्वकोशाची कल्पना त्यांनी आणली. त्यांनी कमाल जमीन धारणा कायदा आणला. त्यांनी महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम व निकोप होईल या साठी प्रयत्न केले. मराठवाड्याच्या शिक्षणाचा खरा केंद्रबिंदू यशवंतराव चव्हाण होत. त्यांना पत्नी वेणूताई यांची खंबीर साथ होती. सरळ व संवेदनशील राजकारणी कसा असावा या साठी यशवंतराव यांच्याकडे पहावे लागेल, असेही डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेसह 39 वर्षापूर्वी स्व यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा अंबाजोगाई शहरात जागर सुरू करणारे स्व. भगवानराव बापू लोमटे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून स्वागत गीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, पाहुण्यांचा परिचय डॉ. कमलाकर कांबळे, आभार प्रदर्शन प्रा. भगवानराव शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. मेघराज पौळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *