“ड्राय डे” चा नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश उच्च न्यायालयाकडन रद्द

छत्रपती संभाजीनगर: तेलंगणा राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगतच्या पाच किलोमीटर अंतरातील बियर बार, देशी दारू दुकान, वाईन शॉप बियर शॉपी बंद करण्यात याव्यात याबाबत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशास नांदेड जिल्ह्यातील मद्य विक्री संघटनेच्या वतीने धर्माबाद येथील मद्दीकता दत्तागौड नरसागौड  यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी नाांदेड यांचा चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर करण्याचा आदेश रद्द केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणा राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होत असल्या कारणाने मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर मतमोजणीच्या दिवशी, अशा प्रकारे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पाच वाजेपासून ते 30 नोव्हेंबर रोजी मतदान संपेपर्यंत व 3 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस या चार दिवसांसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील देशी विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जाहीर केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशास नांदेड जिल्हा मद्य विक्री संघटनेचे श्री. नरसागौड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अॅडव्होकेट विक्रम उंदरे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) महाराष्ट्र देशी विदेशी मद्य विक्री नियम 9 अनुसार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा चुकीचा आहे. तसेच तेलंगणा राज्यातील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश देणे हे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचा युक्तीवाद अॅड. विक्रम उंदरे यांनी केला. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मद्य विक्री बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा युक्तीवाद राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला.  दोन्ही बाजूचा  युक्तीवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी नांदेड यांचा ड्राय डे चा आदेश रद्द केल्याची माहिती अॅड. विक्रम उंदरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *