युवा चित्रकार दिग्विजय कुंभार यांच्या चित्रांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

उस्मानाबाद: तुळजापूर येथील युवा चित्रकार दिग्विजय कुंभार यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. हे चित्रप्रदर्शन चार ते 10 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या पद्म या मालिकेत आयोजित करण्यात आले आहे. जीवनातील सकारात्मकता दाखविणाऱ्या या चित्र प्रदर्शनात श्री. कुंभार यांच्या सुमारे 30 चित्रांचा समावेश आहे.

चित्रकार दिग्विजय कुंभार यांचे जहांगीर आर्ट गॅलरीतील हे दुसरे प्रदर्शन आहे. त्यांचे मार्गदर्शक वडील दत्तात्रय कुंभार यांना समर्पित या चित्र प्रदर्शनात कमळ या विषयावरील कॅनव्हासवरील चित्र मांडण्यात येणार आहेत. सभोवतालची परिस्थिती कशीही असली तरी कमळ स्वत:ची शुभ्रता, पावित्र्य, सौंदर्य व सकारात्मकता टिकवून ठेवते. जगण्यातील ही सकारात्मकता या चित्रातून मांडण्यात आली आहे. या चित्र प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन चित्रकार दिग्विजय कुंभार यांनी केले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *