आता चिकलठाणा विमानतळावरही मिळेल वैमानिक प्रशिक्षण!

संभाजीनगरच्याआकाशात वाढणार विमानांच्या घिरट्या
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) : चिकलठाणा विमानतळावरून प्रवासी व मालवाहतूक सेवांसोबतच आता वैमानिक प्रशिक्षणालाही चालना मिळणार आहे. पुणे येथील एका प्रशिक्षण संस्थेने येथे फ्लाइंग ट्रेनिंग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. संबंधित प्रस्तावाला मान्यता देत विमानतळ प्रशासनाने संस्थेला आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे.

या उपक्रमामुळे आगामी काळात विमानांच्या टेकऑफ-लँडिंगची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रशिक्षणासाठी विमानतळावर दोन विमाने ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये एक सिंगल इंजिन आणि एक डबल इंजिन विमानाचा समावेश आहे. या दोन्ही विमानांद्वारे शिकाऊ उमेदवारांना उड्डाणाचे प्राथमिक धडे दिले जाणार आहेत.

सध्या चिकलठाणा विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी सेवा, मालवाहतूक आणि अधूनमधून सैन्यदलाचे प्रशिक्षण उड्डाणेही पार पडतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चिकलठाणा विमानतळावर फ्लाइंग ट्रेनिंग सुरू करण्यासाठी संबंधित संस्थेसोबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या प्रशिक्षण केंद्राचे अधिकृत उद्घाटन करण्यात येणार आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *